Breaking News

संसदभवन परिसरात आढळली जिवंत काडतुसे

नवी दिल्ली : संसद भवन परिसरात जिवंत काडतुसे आढळल्याने खळबळ उडाली आहे. या विषयावर पोलिसांनी अद्याप मौन बाळगले आहे. श्‍वानपथकाच्या सहाय्याने ही जिवंत काडतुसे निदर्शनास आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधूर वर्मा यांनी मेसेज करून ही माहिती चुकीची असल्याचे म्हटले. मात्र सापडलेली काडतुसे कुठली आहेत, हे विचारल्यावर त्यांनी काहीही उत्तर दिले नाही. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, संसदेजवळील इम्तियाज अली रोडवर हे काडतुसे सापडली आहेत. एका पायी जाणार्‍या व्यक्तीला काडतुसाप्रमाणे काही वस्तू दिसली. त्याने त्वरीत पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत काडतुसे जप्त केली. दरम्यान गृहमंत्रालयाने आधीच अलर्ट जारी केला आहे. दिल्लीत 3 दहशतवादी घुसले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.