Breaking News

चार वर्षांत 70 हजार कोटींचे बँक घोटाळे काँग्रसची मोदी सरकारवर टीका



नवी दिल्ली : भाजपने देशात अराजक माजवले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळे होत असल्याचा आरोप काँग्रेसने केंद्र सरकारवर केला. बँक घोटाळ्यावरूनही केंद्र सरकारवर हल्लाबोल करत 70 हजार कोटी रुपयाचा घोटाळा झाल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, की बँकांमधील वाढते घोटाळे चिंताजनक आहेत. एकूण 13 बँकांमधील घोटाळे समोर आले असून त्याची रक्कम 70 हजार 14 कोटी रुपये एवढी झाली आहे. फरिदाबाद येथील एसआरएस समुहात षडयंत्र, फसवणूक आणि 6 हजार 978 रुपयांचा घोटाळा झाला. एकूण 17 बँकांची फसवणूक झाली आहे. कंपनीने काळा पैसा पांढरा करण्यासह घर खरेदी करणार्‍या सामान्य नागरिकांनाही फसवले आहे.
पुढे ते म्हणाले, की वित्तीय वर्ष 2017-18च्या चौथ्या तिमाहीत भारतीय बँकांचा तोटा 90 हजार कोटी रुपये होता. ही वित्तीय अराजकता मोदी सरकारच्या काळात वाढत चालली आहे. 2013- 14मध्ये एनपीए 2 लाख 63 हजार रुपये होता तो वाढून 10 लाख 30 हजार कोटींवर गेला आहे. चौथ्या तिमाहीत आयडीबीआय बँक सर्वात वाईट कामगिरी करणारी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून 5 हजार 663 कोटी एवढा तोटा झाला आहे. तर एनपीए वाढून 55 हजार 588.26 कोटी रुपये झाला.