Breaking News

बहुजननामा-27 जातीअंताची नुरा-कुस्ती सुरू आहे!

बहुजनांनो.... !
1) मालेगाव बाँम्बस्फोट प्रकरणात 10-12 मुस्लिमांना अटकेत टाकले, शहीद हेमंत करकरेंनी सत्यशोधन करून खर्‍या गुन्हेगारांना अटक केली. या प्रकरणातून त्यांचा खून झाल्यावर निर्दोष मुस्लीम तरूण अनेक वर्षे जेलमध्येच होते.
2) अनेक तरूणांना नक्षलवादी ठरवून 2-2, 3-3 वर्षे जेलमध्ये ठेवणे व त्यानंतर पुराव्याअभावी न्यायालये त्यांची मुक्तता करतात.
3) 2 जी प्रकरणात तामिळच्या ओबीसी-दलित नेत्यांना भरपूर बदनाम केल्यावर, त्यांना अनेक महिने जेलमध्ये ठेवल्यावर 5-6 वर्षांनी सर्वोच्च न्यायालय सांगते की भ्रष्टाचार झालाच नाही, सर्व आरोपी निर्दोष मुक्त!
ओबीसी, दलित, मुस्लीम या सारख्या बहुजनांमधील असंख्य तरूण ऐन उमेदीत असतांना व त्यांचे करियर उज्वलतेकडे धाव घेत असतांना त्यांना खोटे आरोप ठेवून बदनाम केले जाते. न्यालायात ‘तारीख पे तारीख’ देऊन तुरूंगात सडवले जाते. त्यासाठी भारतीय राज्यघटनेचा पुर्णपणे गैरवापर केला जातो. प्रस्थापित व्यवस्थेविरूद्ध वर्मावर घाव घालणारे एकही प्रभावी आंदोलन या देशात सुरू नसल्याचा हा परिणाम आहे. स्वातंत्र्यानंतर हा देश फक्त तीनवेळा पुर्ण खालून-वरून ढवळून निघाला आहे. 1975 च्या नंतरची आणीबाणी व त्यानंतरच्या सार्वत्रिक निवडणुका दरम्यान पहिल्यांदा! दुसर्‍यांदा 1990-92 च्या दरम्यान मंडल विरूद्ध कमंडलची समोरो-समोरच्या लढाईच्या वेळी व तिसर्‍यांदा 2014 च्या निवडणुकात मोदीच्या नावाच्या जयजकाराच्या वेळी! या तिन्ही उलथा-पालथीत वर्ग-जातीचा वा केवळ जातीचा मुद्दा केंद्रस्थानी होता, मात्र त्या मुद्द्याला खुबीने वेगवेगळी लेबले लावून दडपण्यात आले आहे. 1975- 77 दरम्यानच्या वर्ग-जातीय असंतोषाला ‘एकाधिकारशाहीविरोधी’ लढाईचं लेबल लावण्यात आलं. मंडल-कमंडल च्या शूद्ध जातीय संघर्षाला मंदिर-मस्जिदच्या ‘धार्मिक’ लढाईत बुड विण्यात आलं. 2014 ची लढाई शुद्ध ओबीसी केंद्रीत होती व निर्णायक जातीअंताची होती, मात्र या लढाईलाही ‘मोदी-लाट’ म्हणून बदनाम करण्यात आलं!
वर्मावर घाव तेव्हाच घालता येतो जेव्हा शत्रूचं वर्म जाणीले जाते. आणि हे वर्म जाणण्याचं तंत्र ब्राह्णवादाने शास्त्रशुद्धपणे विकसित केले आहे. रावणाचा जीव शरीराच्या इतर क ोणत्याही भागात नसून तो बेंबीत आहे, दुर्योधनाचा मृत्यु त्याच्या मांड्यांमध्ये आहे, हे जाणल्यानंतरच या महान योध्यांचा पराभव शक्य झाला. ब्राह्मणातील बुद्धिमानांनी प्रत्येक पिढीतील बहुजनांचं वर्म जाणून घेतल्याने प्रत्येक संघर्षात ते विजयी होतात. वर्णव्यवस्थेच्या काळात बहुजनांमधून बौद्ध विद्यापीठांमधून एक सशक्त बुद्धीमानवर्ग निर्माण झाला होता व त्याने वर्णव्यवस्थेचे वर्म जाणून त्यावर घाव घातला. पुग-श्रेणीची अधिकाधिक विकसित होत होणारी पर्यायी उत्पादन-वितरण व्यवस्थाही निर्माण केली. मात्र हे केवळ शक्य होतं ते बौद्ध विद्यापीठांच्या उपस्थितीत! पुष्यमित्राच्या राजकीय प्रतिक्रांतीनंतर ही विद्यापीठे निष्प्रभ करण्याचा सपाटा सुरू झाला! त्यातून बुद्धिमानवर्गाची निर्मिती बंद झाली. परिणामी बौद्धधम्मही प्रभावहीन झाला व तो हद्दपारही झाला. बुद्धीमान वर्गाच्या अनुपस्थीतीत ब्राह्मणावादाविरुद्धच्या युध्दात बहुजनसमाजाचा पराभव निश्‍चित होता. परिणामी वर्णव्यवस्थेपेक्षा 100 पटीने जास्त घट्ट, जास्त जाचक अशी जातीव्यवस्था निर्माण करण्यात ब्राह्मणांना सहज शक्य झालं!
कोणत्या ही युद्धात मार्गदर्शन करणारा, धोरणे व डावपेंच ठरविणारा, तत्वज्ञानाचा विकास करणारा बुद्धीमानवर्ग अत्यंत आवश्यक असतो. हा बुद्धिमानवर्ग शत्रूचं वर्म जाणतो व त्यावर निर्णायक घाव घालण्याचं तंत्र विकसित करून सैन्याला समजावून सांगतो. शत्रूचा बुद्धिमानवर्गही हेच काम करत असतो. आज बहुजनसमाजाकडे असा बुद्धिमानवर्गच नाही. जे काही थोडेफार आहेत त्यांना ‘बुद्धीमान-वर्ग’ म्हणून विकसित होऊ दिले जात नाही. त्या व्यक्तीच राहतात व मेल्यानंतर डायरेक्ट ‘देवत्व’ पावतात.
त्यामुळे ब्राह्मणवादाविरूद्धची निर्णायक जातीअंताची लढाई होतच नाही. फुले शाहू आंबेडकरांच्या लढाईतून आरक्षणाचं हत्यार मिळालं. त्यातून बहुजन बुद्धिमान निर्माण होतील व ते ही लढाई पुढे विकसित करतील, असे धोरण होतं. ब्राह्मणी बुद्धीमानांनी हे जातीअंताचं धोरण ओळखलं व ते निष्प्रभ करण्यात ते यशस्वी झालेत. आज आरक्षणातून भीमसैनिक निर्माण होत नाहीत तर दलाल निर्माण होतात. अनुयायी निर्माण होत नाहीत, भक्त निर्माण होतात. आरक्षणातून विद्रोही निर्माण नाही झालेत, पोटभरू नोकरदार निर्माण झालेत. कारण जे शिक्षण त्यांना शाळा-कॉलेजातून देण्यात आलं ते मुळातच ब्राह्मणवादी होतं. पर्यायी समतावादी शिक्षणव्यवस्था निर्माण करावी लागते, असा साधा विचारही तथाकथित दलित-बुद्धिमान आजूनही मांडू शक ले नाहीत. आजही ते ब्राह्मणी विद्यापीठाच्या शिक्षण पध्दतीवरच विसंबून आहेत.
ब्राह्मण हा जन्मतःच बुद्धिमानवर्ग असल्याने तो आपल्या हिताची समाजव्यवस्था विकसित करण्यासाठी रात्रंदिन सतर्क असतो. आजन्म कष्टही घेतो. बाबा पुरंदरे, भिडे भटजी, मिलिंद एकबोटे, अशी कितीतरी असंख्य नावे घेता येतील. बहुजनात असे बोटावर मोजता येतील एवढीच नावे आहेत. त्यांना मान्यता मिळत नाही, कारण मान्यता मिळवून देणारी सर्व साधने ब्राह्मणवाद्यांच्या कब्ज्यात आहेत. आमचे अनेक साहित्यिक-विचारवंत ब्राह्मणी मान्यता मिळविण्यासाठी तत्वात व व्यवहारात तडजोडी करतात.
त्यामुळे जातीअंताच्या लढाईत ब्राह्मणी शत्रूचे वर्म जाणून मार्गदर्शन करणारा प्रामाणिक बुद्धीमान वर्ग आजही उपलब्ध नाही. जे काही आहेत ते व्यक्तिगत आहेत. म्हणून आज आपली लढाई ही लढाई नसून केवळ ‘नुरा-कुस्ती’ आहे. ब्राह्मणी शत्रूचे वर्म जाणून तिच्या वर्मावर घाव घालणारी लढाई सुरू होण्याची वाट पाहू या, तोपर्यंत कडकडीत जयभीम-जयजोती एकमेकांना क रीत राहू या!


प्रा. श्रावण देवरे