Breaking News

पुण्यातील हल्लाबोलसाठी सोलापूरातून 20 हजार कार्यकर्ते जाणार


पुणे, दि.  - राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुकारलेल्या हल्लाबोल आंदोलनाचा 10 जून रोजी पुणे येथे समोराप होणार आहे. समारोपास जिल्ह्यातून 20 हजार कार्यकर्ते जाणार आहेत. यामध्ये महिला कार्यकर्त्यांचाही मोठ्या संख्येने सहभाग राहणार आहे. एका तालुक्यातून किमान 100 वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या कारभाराविरोधात हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून निषेध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी दिली. शासकीय विश्रामगृहावर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

देशात, राज्यात व जिल्ह्यात सत्ताधारी पक्षांकडून द्वेषाचे राजकारण केले जात आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा बँक, बाजार समितीवर सुडबुद्धीने कारवाई केली जात आहे. एकीकडे बंगला अनधिकृत असताना संबंधित मंत्र्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. जिल्हा बँकेची स्थिती आर्थिकदृष्ट्या सक्षम असताना कारवाई केली आहे. प्रत्यक्षात शासनाच्या कर्जमाफी योजनेमुळेच एनपीए वाढला आहे. दुसरीकडे महापालिका आयुक्तांनी सहकारमंत्री यांचा बंगला अनधिकृत असल्याचे न्यायालयात सांगितले आहे. यावर सहकारमंत्री यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणे अपेक्षित असल्याचे साळुंखे यांनी स्पष्ट केले. सहकारमंत्री देशमुख यांनी राजीनामा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच रस्त्यावर उतरणार आहे.