पती, त्याच्या प्रेयसीसह चौघांना 18 जूनपर्यंत पोलिस कोठडी
पुणे - प्रेयसीबरोबर विवाह करण्यासाठी अडथळा नको म्हणून पत्नीसह आठ महिन्याच्या बाळाचा खून केल्याप्रकरणी पती, त्याच्या प्रेयसीसह चौघांना 18 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. थोडगे यांनी दिला आहे.पती दत्ता वसंत भोंडवे (वय 30, रा. दारुंब्रे, ता. मावळ, जि. पुणे), प्रशांत जनगन भोर (वय 25, रा. माण रोड हिंजवडी, मुळ रा. इगतपुरी), पवन नारायण जाधव (वय 21, रा. हिंजवडी) आणि प्रेयसी सोनाली बाळासाहेब जावळे (वय 25, रा. आदर्श कॉलनी वाकड, मुळ रा. पाथर्डी, अहमदनगर) अशी पोलीस कोठडी झालेल्यांची नावे आहेत. नासीर उल (रा. पश्चिम बंगाल) याचा पोलीस शोध घेत आहेत. अश्विनी (वय 25) आणि त्यांचा आठ महिन्याचा मुलगा अनुज यांचा खून करण्यात आला होता.शनिवारी (9 जून) रात्री दहाच्या सुमारास मुळशी तालुक्यातील जांबे गावच्या पुढे नेरे गावच्या दिशेला कोयतेवस्ती जवळ ही घडली होती. लुटीसाठी कोणी अज्ञातांनी आपल्यावर हल्ला करून पत्नी, बाळाचा खून केला. तसेच जवळचे पन्नास हजारही पळवून नेल्याचे आरोपी पती दत्ता भोंडवे यांनी पोलिसांना सांगितले होते. तसेच स्वत:वर वार झाल्याचे भासवून रुग्णालयातही दाखल झाला होता. मात्र, बोलण्यातील विसंगतीतून तो बारा तासांच्या आत पोलिसांच्या जाळ्यात सापडला. सोनाली ही भोंडवे याची प्रेयसी आहे. लग्नात अडथला ठरत असल्याने दोघांनी मिळून अश्विनीच्या हत्येचा कट रचला.