वैद्यकीय प्रवेशाच्या केंद्रीय कोट्यातील 15 टक्के जागांसाठी उद्यापासून ऑनलाईन प्रवेश
पुणे - नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता वैद्यकीयच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. वैद्यकीय प्रवेशाच्या केंद्रीय कोट्यातील 15 टक्के जागांसाठी उद्यापासून (दि. 13) ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. दि मेडिकल काऊंसेलिंग कमिटी (एमसीसी)च्या वतीने नीट उत्तीर्ण उमेदवारांसाठी समुपदेशन सुरू करण्यात येणार असून उमेदवारांना 18 जूनपर्यंत ऑनलाईन नोंदणी आणि कॉलेजची पसंतीची माहिती भरावी लागणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया दोन फेर्यांमध्ये राबविली जाणार असून विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी केवळ दोन संधी मिळणार आहेत. एमबीबीएस, बीडीएस यांसह विविध वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी केंद्रीय कोट्याअंतर्गत 15 टक्के जागांसाठी ‘एमसीसी’द्वारे ऑनलाईन प्रक्रिया राबविली जात आहे. देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी ‘नीट’ ही प्रवेश परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेचा निकाल दि. 4 रोजी जाहीर करण्यात आला. या परीक्षेतील गुणांच्या आधारेच राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित व खासगी विनानुदानित महाविद्यालयांतील व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहेत. यामध्ये एमबीबीएस व बीडीएससह बीएएमएस, बीयुएमएस, बीएचएमएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएसस्सी (नर्सिंग), बीएएसएलपी आणि बीपी अँड ओ या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.