Breaking News

प्लास्टिक व थर्माकोलला पर्याय प्रदर्शनाला 15 हजार लोकानी दिली भेट !

ठाणे - ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण कक्षाने पर्यावरण दिन लोकांना प्लास्टिक व थर्माकोलपासून मुक्ततेचा संदेश देत अनोख्या पध्दतीने साजरा केला. येथील गावदेवी मैदानात आयोजित केलेल्या प्लास्टीक व थर्माकोलला पर्याय या प्रदर्शनाला चार दिवसात 15 हजार ठाणेकरांनी भेट देऊन पर्यावरण रक्षणासाठी आपलाही हातभार लावण्याचा निर्धार केला.

गावदेवी मैदानात प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये विविध स्टॉल धारकांनी भाग घेतला होता. दररोज विविध मान्यवरांची भाषणे, कार्यशाळा यांचे आयोजन करण्यात आले होते. शहरामध्ये गृहसंकुल , व्यापारी संकुले यासाठी स्वच्छता याविषयावर स्पर्धा घेण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती तसेच लघुपटाची स्पर्धा घेण्यात आली. प्रथम पारितोषिक धीरज कांबळे याना थ्रो इट इफ यु कॅन यांस, द्वितीय पारितोषिक वृक्ष हे जीवन आहे लघुपटाला देण्यात आला. तृतीय पारितोषिक राजेंद्र सावंत यांच्या निर्बंध या लघुपटाला देण्यात आले.
कागद, उसाची चिपाड, सुपारी आदीपासून बनवलेल्या प्लेटस, वाट्या, चमचे तसेच मातीत रूपांतरीत होत असलेल्या डस्ट्बीन बॅग, सामानासाठी वापरता येतील अशा पर्यावरणस्नेही बॅगा, प्लास्टिक व थर्माकोलपासून प्रक्रिया करून काढलेले इंधन देखील प्रदर्शनात मांडण्यात आले होते. याशिवाय आदिवासी मुलींनी वारली पेंटिगमध्ये रंगवलेल्या कापडी बॅगा, जुने कपडे, साड्या आदी वापरून केलेल्या पिशव्या, मोबाईल पाऊच, भाजीसाठी पिशवी यांना ग्राहकांची चांगली पसंती मिळाली. प्रदर्शनात ठाणे महापालिकेने नागरिकांसाठी मोफत रोपे घेऊन जाण्याची देखील सोय उपलब्ध करून दिली होती. तसेच पक्ष्यांसाठी नारळापासून, बांबूपासून तसेच मातीपासून केलेली घरटी देखील मोफत उपलब्ध करून दिली होती.