Breaking News

स्वच्छ सर्वेक्षणात शिर्डीचा देशात तिसरा क्रमांक नगरपंचायतीला मिळणार 15 कोटीचे बक्षीस


अहमदनगर : स्वच्छ सर्वेक्षणात शहरांच्या यादीत शिर्डीने देशात तिसरा तर राज्यात दुसरा क्रंमाक पटकावला आहे. एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरात साईनगरीने हे यश संपादन केले आहे़. राज्यात दुसरा क्रमांक पटकावल्या बद्दल शिर्डी नगरपरिषदेला 15 कोटींचे बक्षीस मिळणार आहे़.देशातील शहरे स्वच्छ करण्यासाठी केंद्र सरकारने काही मानके ठरवून देशातील सर्वेक्षण केले होते़. यात एक लाख लोकसंख्येपेक्षा कमी व एक लाख लोकसंख्येपेक्षा अधिक अशी वर्गवारी करण्यात आली होती. यामध्ये शहरातील प्रत्येक घरात कचरा गोळा करणे, त्याचे ओला व सुका असे विलगीकरण करणे, त्यावर प्रक्रिया करणे, सर्वाजनिक शौचालयाची निर्मिती करून स्वच्छता राखणे, स्वच्छतेबाबत जनजागृती करणे, स्वच्छतेची यंत्रणा सुसज्ज करणे, स्वच्छता कर्मचार्यांना प्रशिक्षण, गणवेश देणे आणि जनजागृती करणे इत्यादी निकषांचा समावेश होता़. केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या मानकाप्रमाणे काम होते की नाही हे तपासण्यासाठी केंद्रीय पथकाने पाहणीही केली होती. त्यात शिर्डी नगरपंचायतीने उत्तम कामगिरी केल्याने शिर्डीचा देशात तिसरा तर राज्यात दुसरा क्रमांक आला आहे़. यासाठी राज्य सरकारकडून 15 कोटींचे बक्षीस मिळणार आहे. 
शहरातील तरुणांनी ग्रीन शिर्डी, क्लीन शिर्डीच्या माध्यमातून चार वर्षापासून काम सुरू केले होते़. या कामात शिर्डीचे उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर, नगरसेवक अभय शेळके, गटनेते अशोक गोंदकर, मंगेश त्रिभुवन, दत्तात्रय कोते आदींसह सर्वच नगरसेवकांचा मोलाचा वाटा आहे.