Breaking News

मेहुल चोक्सीविरोधात 155 गुंतवणूकदारांचे आंदोलन गीतांजली कंपनीच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक


मुंबई - पंजाब नॅशनल बँकेला लाखो कोटींचा चुना लावणार्‍या नीरव मोदीचा मामा मेहुल चोक्सीने 155 गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा प्रकार बोरीवलीत समोर आला आहे. या ठगाने गीतांजली कंपनीच्या माध्यमातून अनेकांना घरे देण्याचे स्वप्न दाखवून त्यावर पाणी फिरविले. संतापलेल्या गुंतवणूकदारांनी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीबाहेर तीव्र आंदोलन केले. बोरिवली पूर्व येथील राजेंद्र नगर याठिकाणी पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य फरार आरोपी नीरव मोदी याचा मामा मेहुल चोक्सी यानेही गुंतवणूकदारांची फसवणूक केली. या विरोधात बोरीवलीत गीतांजली कंपनीद्वारे बांधकाम होत असलेल्या इमारतीबाहेर गुंतवणूकदारांनी तीव्र आंदोलन केले. यावेळी गुंतवणूकदारांनी मेहुल चोक्सी ’हाय हाय’ अशी घोषणाबाजीदेखील केली. गुंतवणूकदारांनी मेहुल चोक्सी याच्या गीतांजली कंपनीद्वारे होणार्‍या इमारतीच्या प्रकल्पातील फ्ल ॅटसाठी पैसे भरले आहेत. बॉलीवुड कलाकारांद्वारे जाहिरात करून गुंतवणूकदारांना आलिशान फ्लॅट देण्याचे गीतांजली कंपनीकडून आमीष दाखविण्यात आले होते. 
त्यानुसार 2010 ला काही गुंतवणूकदारांनी घर खरेदी करण्यासाठी बुकिंग केले. मात्र मेहुल चोक्सी याच्या बांधकाम कंपनीकडून गुंतवणूकदारांना 2013 साली घर देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. परंतु त्यानंतरसुद्धा बुकिंग केलेल्या नागरिकांना फक्त तारीख देण्यात आली. मात्र अद्यापपर्यंत घर देण्यात आलेली नाहीत. व्यथित झालेल्या गुंतवणूकदारांनी रेरासह विविध ठिकाणी सरकारी कार्यालयात, पोलिसांकडेदेखील तक्रारी केल्या. मात्र अद्याप याची कोणीच दखल घेतली नाही. अखेर गुंतवणूकदारांनी बोरीवली येथील बांधकाम होत असलेल्या इमारतीखाली आंदोलन केले.