Breaking News

ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी पोलीस बिटमार्शल करिता 15 बुलेट ठाणे पोलीस आयुक्तांकडे केल्या सुपूर्द

ठाणे, दि. 03, जून - ’ठाणे शहर व सभोवतालच्या परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी ठाणे महापालिकेकडून पोलीस बिटमार्शल करिता 15 बुलेट अत्याधुनिक फिटिंगसह ठाणे पोलीस विभागास देण्यात आल्या. आज ठाणे महापलिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडे या बाईकच्या चाव्या सुपूर्द केल्या.

ठाणे शहर स्मार्ट सिटी होत असून शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन अद्यावत असणे आवश्यक असून या बाईकच्या माध्यमातून एखाद्या घटनास्थळी पोलिसांना तात्काळ पोहचणे व शहरात गस्त घालणे सोपे जाणार आहे. यापुढेही महापालिका प्रशासन पोलिसांना नेहमीच सहकार्य करत राहील असा विश्‍वास महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचे विशेष आभार मानले. 
यावेळी ते म्हणाले, शहरातील सुरक्षा सुरळीत नसेल तर विकास होणार नाही. या शहराच्या सुरक्षेकरिता पोलीस प्रशासन आणि महापलिका प्रशासन एकत्र काम करत असून महापालिका आयुक्तांचे नेहमीच सहकार्य पोलीस प्रशासनाला मिळत आहे. यावेळी ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त (1) सुनील चव्हाण,अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रतापराव दिघावकर, पोलीस सह आयुक्त मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त(मुख्यालय) संदीप पालवे, ठाणे महापालिका उप आयुक्त ओमप्रकाश दिवटे तसेच पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या अत्याधुनिक अतिशीघ्र आग व बचाव वाहनाची पोलीस आयुक्त व महापालिका आयुक्तांनी पाहणी केली. शहरात आपत्कालीन परिस्थितीमध्ये हे वाहन कसे कार्य करते याचे यावेळी प्रात्यक्षिक देण्यात आले.