Breaking News

अतिक्रमणकर्त्यांना हायकोर्टातून दिलासा नाही


नागपूर, दि. 05, मे - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जागेवर अनधिकृतपणे अतिक्रमण करून अनेक वर्ष रेस्टारंन्ट, लॉन चालवणा-यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला आहे. यासंदर्भात या अतिक्रमणकर्त्यांनी दाखल केलेली याचिका न्या. भूषण धर्माधिकारी व न्या. अरुण उपाध्ये यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली.
 
नागपूर विद्यापीठाच्या मौजा पांढराबोडी येथील जमिनीवर गेल्या अनेक वर्षांपासून नत्थू यादव, राकेश यादव, रमेश बनिया व मिलिंद साबळे यांनी अतिक्रमण करून लॉन, कॅफे आणि रेस्टारंटचा व्यवसाय सुरू केला होता. दरम्यान प्रशासनाने 30 डिसेंबर 2017 रोजी कारवाई करून अतिक्रमण काढून टाकले. प्रशासनाच्या या कारवाईवर याचिकाकर्त्यांचा आक्षेप होता. या जमिनीवर 100 वर्षांपेक्षा जास्त काळापासून ताबा आहे. त्यामुळे जमिनीवरून हटवता येणार नाही असा त्यांचा दावा होता. याप्रकरणी त्यांनी प्रशासनाच्या कारवाईच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. याचिकेनुसार वादातील जमीन याचिकाकर्त्यांच्या मालकीची असल्याचे घोषित करण्यात यावे, बांधकाम हटविण्याची कारवाई अवैध ठरविण्यात यावी, संबंधित अधिकार्‍यांवर न्यायालय अवमाननेची कारवाई करण्यात यावी, याचिकाकर्त्यांना जमिनीचा ताबा परत देण्यात यावा आणि बांधकाम व फर्निचर जशाच्या तसे तयार करून देण्यात यावे अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली होती. दरम्यान न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेऊन याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळे आता ही जागा नागपूर विद्यापीठाच्या ताब्यात राहणार आहे.