Breaking News

शेतमालाचे भाव कोसळल्याने शेतकरी चिंतातुर


सिंदखेडराजा, दि. 05, मे - शेतमालाचे भाव कोसळल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. कापूस, सोयाबीन, तूरीला पुरेसा बाजारभाव नाही. उत्पादन खर्चही निघत नसल्याने संसाराचा गाडा कसा चालवावा, असा प्रश्‍न शेतकर्‍यांपुढे उभा ठाकला आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत सत्तेवर आलेल्या राज्यकर्त्यांनी शेतकर्‍यांचा गांभीर्याने विचार केला नाही. पाच वर्षांपुर्वी कापसाला 6 ते 7 हजार प्रतीक्विंटलचा बाजारभाव मिळाला होता. तोच कापूस आज 4 ते 5 हजार रुपयापर्यंत विकावा लागत आहे. यावर्षी सिझनमध्ये 2,500 ते 2,800 रुपये सोयाबीनचे भाव होते. सध्या शेतक र्‍यांजवळील सोयाबीन संपल्यावर 2,700 रुपयावर गेले. शासनाने तूर, हरभरा खरेदी बंद केल्यामुळे बाजारभाव कोसळले असून बळीराजा हतबल झाल्याचे दिसत आहे.

मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न, संसाराचा गाडा चालविताना शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून आत्महत्येचे पाऊल उचलत आहे. निसर्गाचासुद्धा समतोल ढासळत चालला आहे. कधी अतिवृष्टी, कधी गारपीट तर कधी उघाड पडल्यामुळे नापिकी होऊन शेतकरी त्रस्त आहे. एवढ्या संकटामधून हाती आलेल्या शेतमालाला शासनाच्या आयात निर्यात धोरणाचा फटका बसत असल्यामुळे शेतकरी संकटात सापडला. राज्यकर्त्यांनी खुर्च्या टिकविण्यासाठी सबसीडीच्या नावावर कांदा चाळ, पीयुसी पाईप, विहिरी, मोटारपंप, शेडनेट, शेततळे देऊन शेतकर्‍यांप्रती मदत देण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला. परंतु आजही असंख्य शेतकर्‍यांचे सबसीडीचे पैसे जमा न झाल्याने शेतकरी त्रस्त आहे. केंद्र शासनाने एक वर्षापुर्वी लाखो टन तूरदाळ, चनादाळ, तेल, रुईच्या गाठी, गहू आयात केल्याने शेतीमालाचे बाजारभाव कोसळले असून शेतकर्‍यांच्या शेतमालाला मातीमोल भाव मिळत आहे. उत्पादन खर्च सुद्धा वसुल होत नाही. सात हजारापर्यंत विकल्या गेलेला कापूस आज चार ते पाच हजार रुपयाने विकत आहे. त्यामुळे अनेक शेतक-यांच्या घरात कापूस साठवून आहे.