Breaking News

‘निमोणे’चे सरपंचपदी संदीप देशमुख कायम जात पडताळणी आदेशाला स्थगिती


संगमनेर/प्रतिनिधी। तालुक्यातील निमोण ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप देशमुख यांचे सरपंचपद कायम राहिले आहे. जात पडताळणी विभागाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगिती निर्णयामुळे देशमुख यांचे सरपंचपद वाचले. 

निमोण ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्यानंतर सरपंचपदावर निवडून आलेले संदीप देशमुख यांच्या जातपडताळणी प्रमाणपत्रावर आक्षेप घेत त्यांचे पद रद्द करण्याची मागणी माजी सरपंच अनिल घुगे यांनी केली होती. या तक्रारीची दखल घेऊन जातपडताळणी विभागाने संदीप देशमुख यांचे पद रद्द ठरविले होते. याविरुद्ध देशमुख यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात जात पडताळणी विभागाच्या निर्णयाविरोधात स्थगिती मिळावी, म्हणून याचिका दाखल केली होती. जात पडताळणी विभागाच्या आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती द्यावी, अशी मागणी देशमुख यांनी केली होती. उच्च न्यायालयाने देशमुख यांच्या अर्जाला स्थगिती दिली. मात्र उच्च न्यायालयानेच पंधरा दिवसानंतर हा स्थगिती आदेश कायम ठेवण्यास नकार दिला. त्यानंतर देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन जात पडताळणी विभागाच्या आदेशालाच स्थगिती मिळावी, यासाठी अर्ज दाखल केला होता. देशमुख यांच्या अर्जावर सर्वोच्च न्यायालयाने म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जात पडताळणी विभागाच्या आदेशाला आणि पूर्वी उच्च न्यायालयाने दिलेला स्थगिती आदेश कायम ठेवला. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे देशमुख यांना दिलासा मिळाला.