Breaking News

जळगाव परिवहन विभाग उत्पन्नात राज्यात पहिल्या क्रमांकावर - राजेंद्र देवरे


जळगांव, दि. 05, मे - राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागाने सन 2017-18 या आर्थिक वर्षात 1 कोटी 91 लाख रुपये उत्पन्न मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला असल्याची माहिती विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

श्री. देवरे म्हणाले की, शिवशाही बस सेवेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. नवीन बसगाड्या लवकरच सेवेत दाखल होणार असून जुन्या बस गाड्यांच्या तुलनेत नवीन गाड्या आकर्षक रंगछटा आणि अधिक आरामदायी आहेत. जळगाव विभाग उत्पन्नात राज्यात नेहमी पहिल्या पाच क्रमांकात राहिलेला असून ती परंपरा अखंडीत ठेवली जाईल. महामंडळाने नव्याने अंमलात आणलेले वाहक व चालकांचे गणवेश प्राप्त झाले असून त्यांचे वितरण लवकरात लवकर सर्वांना करण्यात येणार आहे. एस.टी.बस सेवेपासून दूरावलेला प्रवासी पुन्हा एस.टी.सेवेकडे आकर्षित करण्यासाठी आवश्यक ते प्रवासी मार्ग सुरु करुन त्यांना अपेक्षित दर्जाची सेवा पुरविण्यात येईल असेही श्री. देवरे यांनी सांगितले.

बसपोर्ट काम लवकरचसुमारे 300 कोटी रुपये खर्च करुन जळगाव बस स्थानकाचे सर्व अद्ययावत सोईनीयुक्त बसपोर्टचे काम लवकरात लवकर सुरु करण्यात येणार असल्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले. बस स्थानकाचे प्रवेशद्वार, सुरक्षा, स्वच्छता आदि विषयावरही त्यांनी यावेळी माहिती दिली. चौकशी व उद्घोषणा कक्षात एक सहाय्यक नियुक्त केला जाईल. जेणे करुन प्रवाशांना माहिती मिळण्यास मदत होऊन संवादही साधता येईल.