Breaking News

महिलांनी मोठे उद्योजक व्हावे : पुष्पाताई काळे


कोपरगाव : बचत गटाच्या महिलांनी कोणताही एकच व्यवसाय न करता वेगवेगळ्या व्यवसायाची निवड केली पाहिजे. आज लघु व्यवसाय सुरु करण्यासाठी घेत असलेल्या कर्जाची नियमित फेड करण्याची जिद्द मनात ठेवून बचत गटाच्या महिलांनी भविष्यात मोठे उद्योजक होण्याची तयारी ठेवावी असे प्रतिपादन प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांनी केले.

यावेळी तालुक्यातील बचत गटाच्या महिलांना पुष्पाताई काळे यांचेहस्ते 11 लाख रुपयांचे कर्जवाटपाचे धनादेश देण्यात आले, याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी अष्टविनायक महिला बचत गट मुर्शतपूर, स्तवन मंजिरी महिला बचत गट खडकी वडांगळे वस्ती, सुखमणी महिला बचत गट निवारा, नानकसाई महिला बचत गट राजपाल सोसायटी, दत्तराज महिला बचत गट कोकमठाण व हर्षल महिला बचत गट हनुमाननगर, कोपरगाव आदी बचत गटाच्या महिलांना प्रत्येकी एक लाख ऐंशी हजार रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले.

बचतगटाच्या महिलांनी वेळोवेळी आयोजित करण्यात येणार्‍या विविध शिबिरांचा लाभ घ्यावा. शिबिराच्या माध्यमातून विविध व्यवसाय करण्यासाठीचे महिलांना मोफत मार्गदर्शन दिले जाते, तसेच आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचा लाभही महिलांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी उपस्थित महिलांना केले. यावेळी बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या.