Breaking News

दूध महासंघ सरसावला ; उत्पादक शेतकऱ्यांचे काय? शेती जोडधंद्याला घरघर ; दूध उत्पादकांत असंतोष

बाळासाहेब शेटे / अहमदनगर ;- दूध उत्पादक शेतकऱ्याने तक्रार करण्याअगोदरच दूध महासंघ संकटात असल्याचे सांगत महासंघाची ही मंडळी सरकारविरुद्ध कोर्ट कचेऱ्या खेळण्यासाठी सरसावली आहे. मात्र या असंघटित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे हड्पणाऱ्या खासगी दूध संकलन केंद्रचालकांच्या मालमत्तेत कमालीची वाढ कशी झाली, या केंद्रांमध्ये जमा होणारे सॅम्पल’चे दूध कोठे जाते, हे महाभाग सरकारी तिजोरीत कर भरतात का, या लोकांच्या संपत्तीची चौकशी सरकार करणार का हे आणि असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. या धंद्यात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत राब राब राबणारे दूध उत्पादक शेतकरी मात्र कर्जबाजारी होत आहेत. खासगी दूध संकलन केंद्रचालक मात्र आर्थिकदृष्ट्या कमालीचे ‘गब्बर’ झाले आहेत. या लोकांविषयी दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मात्र प्रचंड असंतोष खदखदतो आहे. 

राज्यात सहकार चळवळीची पाळेमुळे घट्ट करणारे ज्येष्ठ नेते

स्व. यशवंतराव चव्हाण यांनी शेतीला जोडधंदा म्हणून सहकारी तत्वावर संकरित गायीच्या दूधविक्रीचा व्यवसायाचा योग्य पर्याय या राज्यात आणला. या पर्यायाने अल्पभूधारक शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाला. त्याचे जीवनमान काहीसे उंचावले. मात्र अलीकडे या सहकार चळवळीत स्वार्थी प्रवृत्ती बोकाळल्याने दूध उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. दुर्दैवाने दूध उत्पादक शेतकरी संघटित नसल्याने खासगी दूध संकलन केंद्रचालक या बळीराजाचे ढेकणासारखे रक्त शोषून घेत आहेत. सरकी पेंड, वालिस या खुराकाचे गगनाला भिडणारे भाव आणि घासावर पडत असलेल्या रोगामुळे हिरव्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र हा सारा विचार करता दुधाला मिळत असलेल्या १५ रुपये या भावात जमाखर्चाची तोंडमिळवणी करतांना दूध उत्पादक शेतकरी वैतागला आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पुढाऱ्यांचे बगलबच्चे चालवित असलेल्या खासगी डेअऱ्यांपुढे समाजाच्या या असंघटित घटकाला शासन दरबारी न्याय मिळण्याची चिन्हे मात्र धूसर झाली आहेत. 

यांचा ताळेबंद मांडणार कोण? 

सोनईनजिकच्या हनुमानवाडी परिसरातील राजकीय नेत्याचा एक कार्यकर्ता चार पाच वर्षांपूर्वी अवघ्या १५ गुंठ्यांचा मालक होता. मात्र आजमितीला त्याच्याकडे साडेपाच एकर जमीन, प्रशस्त बंगला, सोनईत चार दोन गाळे, एक बुलेटसह अन्य दुचाकी, चारचाकी वाहन, तगडा बँक बॅलन्स आणि हे कमी म्हणून की काय बेकायदा सावकारीतून दर महिन्याला मिळत असलेले लाखो रुपयांचे व्याज. ही सारी आर्थिक प्रगती ज्या दूध डेअरीच्या आधारे या महाभागाने केली, त्या डेअरीचे ‘ऑडिट’ कोण करणार, त्याच्या नफा तोट्याचा ताळेबंद कोण मांडणार, हा खरा प्रश्न आहे. 

सामाजिक कार्यकर्ते मात्र ‘सेटिंग’मध्येच मश्गुल

याच भागातील आणखी एक डेअरी चालकाच्या दावणीला आजमितीला एकही गाय नाही. मात्र हजारो लिटर दूध संकलनातून ‘सॅम्पल’ म्हणून जमा होणारे शंभर लिटर या महाभागाच्या खात्यावर जमा होते. त्यामुळेच या इसमाने प्रशस्त बंगल्याचे बांधकाम अवघ्या काही महिन्यांतच पूर्ण केले. दूध उत्पादक शेतकऱयांचे ढेकणाप्रमाणे रक्त शोषण करत असलेल्या या ‘पाटला’विरुद्ध आवाज उठविण्याऐवजी सोनईतील स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते मात्र ‘सेटिंग’मध्येच मश्गुल आहेत.