Breaking News

वाद बाजूला ठेऊन निवडणुकीच्या कामाला लागा - छगन भुजबळ


नाशिक, दि. 10, मे - आपापसातील वाद बाजूला ठेवून निवडणुकीच्या कामाला लागा. एकटा माणूस कुठे कुठे धावणार? याआधीचे जे झाले ते झाले. सगळं बाजूला ठेवा आणि आपला उमेदवार निवडून कसा येईल याकडे लक्ष द्या. असे आदेश राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांनी मुंबईतील केईएम रुग्णालयात छगन भुजबळ यांची भेट घेतली. याप्रसंगी राष्ट्रवादीचे आमदार जयवंत जाधव, प्रदेश चिटणीस अर्जुन टिळे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांची उपस्थिती होती. त्यांच्याशी संवाद साधताना भुजबळ बोलत होते.

छगन भुजबळ यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर थोड्याच दिवसांत ते राजकारणात पुन्हा एकदा सक्रीय होणार आहेत. त्यांच्या हल्लाबोल यात्रेला पुण्याहून लवकरच प्रारंभ होण्याची शक्यात वर्तविण्यात आली आहे. नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील गटतट समोर येत असल्याने उमेद्वाराला याचा फटका बसु नये यासाठी भुजबळानी पक्षातील क ार्यकर्त्यांना गटतट विसरुण कामाला लागण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे पक्षांतर्गत गटबाजीला आळा बसणार आहे.

त्याचा फायदा विधान परिषद निवडणूकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भुजबळ यांच्या जामिनानंतर शरद पवार त्यांच्याकडे निवडणुकीत काय भूमिका देतील हे अद्याप अस्पष्ट असले तरी लवकरच भुजबळ समर्थकांना त्यांचे विचार ऐकण्यास मिळणार असल्यामुळे समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.नाशिक जिल्ह्यात भुजबळ समर्थकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भुजबळ यांची भूमिका महत्वाची मानली जात आहे.