पावसाळी गटारे व नैसर्गिक नालेसफाईच्या कामांना वेग
नवी मुंबई, दि. 10, मे - महानगरपालिकेच्या आठही विभाग कार्यालय क्षेत्रातील गटारे व नालेसफाईची कामे सुरु करण्यात आली असून गटारे व नालेसफाई विहीत वेळेत आणि व्यवस्थितरित्या पूर्ण होईल याकडे कटाक्षाने लक्ष देण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी दिले आहेत. त्यानुसार पावसाळी गटारे व नालेसफाईच्या कामाला वेग आला आहे.
बेलापूर ते दिघा अशा आठही विभागांमध्ये अस्तित्वात असलेली पावसाळी गटार सफाईची कामे 15 एप्रिल पासून सुरु करण्यात आलेली आहेत. ही पावसाळी गटार सफाईची कामे साधारणत: 70 टक्के पूर्ण झाली असून उर्वरीत पावसाळी गटार सफाई 15 मे पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
त्याचप्रमाणे आठही प्रशासकिय विभागांमध्ये असलेल्या 74 नैसर्गिक नाल्यांची सफाई कामे घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत सुरु करण्यात आली असून यामधील 7 महत्वाच्या नैसर्गिक नाल्यांची सफाई अभियांत्रिकी विभागामार्फत करण्यात येत आहे. या सर्व नैसर्गिक नाल्यांची सफाई 25 मे पर्यंत करण्याचे नियोजन आहे.
पावसाळी कालावधीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कुठेही पाणी तुंबुन जनजीवन विस्कळीत होणार नाही याची दक्षता घेण्यात येत असून महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांचे निर्दे शानुसार सर्व विभागांचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता व उप अभियंता तसेच स्वच्छता अधिकारी व स्वच्छता निरीक्षक यांचेमार्फत पावसाळी गटारे व नालेसफाईकडे बारकाईने लक्ष देण्यात येत आहे. तसेच उद्यान विभागामार्फत धोकादायक झाडे शोध मोहिम हाती घेण्यात आली असून त्याबरोबरच अनावश्यक वृक्ष फांद्यांची छाटणी करण्यात येत आहे.
महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्राधिकरणे व पोलीस आणि अनुषांगिक कार्यालये यांची शहर आपत्ती व्यवस्थापन समिती क ार्यरत असून पावसाळी कालावधीकरीता सर्व प्राधिकरणे व कार्यालये यांनी केलेल्या पूर्वतयारीचा आढावा महापालिका आयुक्त स्वत: घेणार आहेत.