Breaking News

पिंप्री कोलंदर येथे विचारमंथन व्याख्यानमालेचे आयोजन


श्रीगोंदा तालुक्यातील पिंप्री कोलंदर येथे विचार मंथन आश्रमाच्या वतीने आध्यात्मासह इतर सामाजिक ज्वलंत प्रश्‍नांवर प्रकाश टाकताना प्रबोधनात्मक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.ह.भ.प. बाळासाहेब महाराज धोत्रे यांच्या संकल्पनेतून जनजागृतीपर आयोजित केलेल्या विचारमंथन अखंड हरिनाम सप्ताहास उत्साहात प्रारंभ झाला. बुधवारी या सप्ताहास प्रारंंभ झाला असून दि.22 रोजी सांगता होणार आहे. या कालावधीत काकडा, ज्ञानेश्‍वरी पारायण, नाम, जप यज्ञ, सत्संग, प्रवचन, हरिपाठ, व्याख्यान आणि संगीत भजन आदी धार्मिक कार्यक्रम होणार असून दररोज सायंकाळी 7 ते 9 या वेळेत विविध सामाजिक विषयांवर नामवंताची व्याख्याने होणार आहेत. 

बुधवार दि.16 रोजी बालरोग तज्ज्ञ डॉ. सतिष आंधळे यांचे स्त्री भ्रूण हत्या टाळा आणि बालकांचे संगोपण या विषयावर व्याख्यान झाले. गुरुवार दि. 17 रोजी अहमदनगर जि.प. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे या महिला सबलीकरणावर बोलल्या. तसेच आज कृषीतज्ज्ञ रविंद्र वाघ हे शेती विषयक माहिती सांगणार आहेत. शनिवार 19 रोजी योगाचार्य अनंत झांबरे हे प्रात्यक्षिकासह योग व प्राणायामाचे धडे व माहिती देणार आहेत. रविवार दि.20 रोजी अ‍ॅड. संभाजी बोरुडे यांचे लोकशाहि आणि भारतीय समाजाची मानसिकता या विषयावर व्याख्यान होईल. सोमवार दि.21 रोजी प्रा.पद्माकर पंडीत हे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या सहसंबंधाबाबत बोलणार आहेत, 

तर मंगळवार दि.22 रोजी शिव व्याख्याते केशव कातोरे हे आपल्या व्याख्यानातून महापुरुषांचे महत्व विशद करणार आहेत. बुधवार दि. 23 रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत ह.भ.प. बाळासाहेब महाराज धोत्रे यांचे काल्याचे किर्तन होणार असून उदयोजक सचिन कातोरे यांच्या महाप्रसादाच्या कार्यक्रमाने सप्ताहाची सांगता होणार आहे.सप्ताहाच्या यशस्वितेसाठी विचार मंथन आश्रमाचे साधक व कोळेश्‍वर तरुण मंडळाचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.