Breaking News

जम्मू-काश्मीर : पाकिस्तानकडून गोळीबार, पाच ठार

जम्मू - जम्मू-कश्मीरमधील जम्मू जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानने शुक्रवारी गोळीबार आणि शेलिंग हल्ला केला. यात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) एका जवानासह पाच जणांचा मृत्यू झाला. तर 10 जण जखमी झाले आहेत. आर.एस. पुरा, अर्निया आणि बिश्‍नाह भागात पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा जवान सीताराम उपाध्यायसह पाच जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या नागरिकांमध्ये 45 वर्षीय महिलेसह तीन पुरुषांचा समावेश आहे. तसेच बीएसएफच्या एका सहायक उप-निरीक्षकासह 10 जण जखमी झाल्याचे, एका पोलीस अधिकार्‍याने सांगितले. ते म्हणाले, भारत-पाकिस्तानदरम्यान सुरू असलेल्या गोळीबारामुळे प्रभावित झालेल्या भागातून नागरिकांना काढण्यात येत आहे. यावर मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी शोक व्यक्त केला आहे. मुफ्ती यांनी ट्वीट केले आहे, की जम्मूत सीमेवर नियमितपणे होणारा गोळीबार हे दुःख आणि चिंतेचे कारण आहे. दुःखद गोष्ट ही, की जेव्हा आमच्या देशाने रमजानदरम्यान कारवाई थांबवण्याबरोबरच शांततेसाठी अग्रणी भूमिका घेतली, मात्र पाकिस्तानने या पवित्र महिन्यासाठी कसल्याही प्रकारचा सन्मान दाखवला नाही. तसेच पाकिस्तानला शांततेसाठी समोर येऊन योगदान द्यावे लागेल. मी पीडितांच्या दुःखात सहभागी आहे, असेही मुफ्ती यांनी म्हटले आहे.