Breaking News

सामाजिक भावनेतून आरोग्य सेवेचे कार्य सुरु : डॉ.सुजय विखे


कुळधरण : सामाजिक बांधिलकी आणि भावनेतून आरोग्य सेवेचे कार्य सुरु आहे. त्याचा निवडणूकीशी काही संबंध नाही. कोणाला काय वाटते याचा विचार न करता सर्वत्र काम सुरु आहे. राजकीय व्यासपिठावर नुसते भाषण देऊन चालत नाही तर, त्यास प्रत्यक्ष कृतीची गरज असते. जनतेला खोटे आश्‍वासन देऊन फसविण्याचे दिवस आता राहिले नाहीत असे मत डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.

कर्जत तालुक्यातील राशीन येथील जगदंबा विद्यालयात आयोजित मोफत सर्वरोग निदान शिबिराचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी सरपंच मिरा देशमुख होत्या. यावेळी माजी जि.प. सदस्य संभाजी राजेभोसले, माजी जि. प. सदस्य प्रविण घुले, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, अल्लाऊद्दिन काझी, विजय मोढळे, दादासाहेब सोनमाळी, माजी पं.स. सदस्य शंकर देशमुख, संग्राम पाटील, शाहु राजेभोसले, शहाजी राजेभोसले, उपसरपंच साहेबराव साळवे, भिमराव साळवे, दादासाहेब कानगुडे, बापुराव धोंडे, डॉ. राजकुमार आंधळकर, संतोष काशिद, सुभाष जाधव, प्रकाश बजाज, नवनाथ जांभळकर, अ‍ॅड.सुरेश शिंदे, चंदन भिसे, बापुराव सुपेकर, मोहन सुपेकर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.

विखे पुढे म्हणाले की, कर्जत तालुक्यात विविध पक्षांची सत्तांतरे झाली मात्र, लोकप्रतिनिधीच्या माध्यमातुन जो विकास व्हायला पाहिजे होता, तसा झालेला दिसत नाही, या भागात सुविधायुक्त रूग्णालये नसल्यानेच शिबिराचे आयोजन केले आहे. राजकिय प्रवासामध्ये मतभेद असु शकत नाही. सामाजिक दायित्वाच्या भावनेनेच या शिबिराचे आयोजन केले. म्हणुनच सर्वच पक्षातील नेतेमंडळी व्यासपीठावर उपस्थित आहेत. आजार काही पक्ष बघुन होत नाही, तो कोणालाही होतो, त्याचे योग्यवेळी निदान झाले पाहिजे, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली. आरोग्य शिबिराच्या माध्यमातुन सामाजिक दायित्व मी स्विकारले आहे. मागील राजकिय वाटचाल पाहता कर्जत तालुक्याने माझ्या आजोबापासुन विखे कुटुंबावर विशेष प्रेम आहे. असेच प्रेम तालुक्यातील नेते मंडळींनी दिले, नेतृत्व करण्याची संधी मला दिली तर मी तयार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात 16 आरोग्य शिबीरे झाली असुन, 35 हजार रूग्णांवर मोफत उपचार झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात शंकर देशमुख यांनी शिबीर आयोजनाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निलेश दिवटे यांनी केले. डॉ. राजकुमार आंधळकर यांनी आभार मानले.