Breaking News

बालभवन’च्या मुलींची नृत्यस्पर्धेसाठी निवड


संगमनेर : येथील संस्कार बालभवनच्या मुलींनी पुण्यात झालेल्या राष्ट्रीय नृत्यस्पर्धेत नेत्रदीपक यश संपादन केले. देशभरातील २० राज्यांतून आलेल्या शेकडो स्पर्धकांत अफलातून भरतनाट्यम् सादर करीत बालभवनने वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन्ही प्रकारात वर्चस्व निर्माण केले. अखिल भारतीय लोककला कल्चरल ऑर्गनायझेशनच्यावतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत उत्कृष्ट नृत्य सादर करीत बालभवनच्या मुलींनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी ‘बँकॉक’ची कवाडे उघडली आहेत.
‘ऑल इंडिया डांस, ड्रामा, म्युझिक फेस्टिव्हल युनिव्हर्सल हार्मनी’ या शिर्षकाखाली पुण्यातील गणेश कला-क्रिडा ऑडिटोरिअममध्ये या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत २० राज्यातून आलेल्या एकूण १ हजार ३५० स्पर्धकांचा सहभाग होता. संगमनेरच्या संस्कार बालभवनचे एकूण तीन संघ मिळून ३० मुली यात सहभागी झाल्या होत्या. भारतीय नृत्यशैलीतील भरतनाट्यम् सादर करतांना बालभवनच्या नृत्यनाद व पद्मिनी या दोन संघांनी प्रथम तर नटराज समुहाने तृतीय पारितोषिक पटकाविले. या तीनही संघांच्या प्रशिक्षकांना सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शनाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. 

वैयक्तिक नृत्यप्रकारातही बालभवनने आपले वर्चस्व कायम राखले. उत्कृष्ट पदलालित्य, नेमकी देहबोली, डोळ्यांची हालचाल या जोरावर बालभवनच्या मुलींनी सादर केलेल्या एकूण ६ वैयक्तिक नृत्यांपैकी चार नृत्यांना प्रथम तर दोन नृत्यांना तृतीय पारितोषिक देण्यात आले. या संपूर्ण स्पर्धेत बालभवनने एकूण १२ सन्मानचिन्ह पटकावित भरघोस यश मिळविले. कुसुम इंगळे-गुंदेचा यांनी बालभवनच्या मुलींना मार्गदर्शन केले. कोलकाता येथून आलेल्या प्रसिद्ध नृत्यांगणा किया चंदा आणि टॉलीवूडचे नृत्यदिग्दर्शक राजेश कपूर यांनी स्पर्धेचे परिक्षक म्हणून काम पाहिले. माजी महापौर प्रशांत जगताप, मराठी चित्रपटसृष्टीचे दिग्दर्शक रोहित नागभिडे यांच्या उपस्थितीत विजेत्या स्पर्धकांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. बालभवनने मिळविलेल्या नेत्रदीपक यशाबद्दल गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, बालभवनच्या संचालिका अनुराधा मालपाणी यांनी विजेत्या मुलींचे अभिनंदन केले आहे.