शिवसेनेचे माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांना अटक
औरंगाबाद - शहरात झालेल्या दंगलीतील अटक आरोपींना तत्काळ जामिनावर सोडा, अशी मागणी करत क्रांती चौक पोलीस स्टेशनमध्ये तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार आणि माजी आमदार असलेल्या प्रदीप जैस्वाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज त्यांना अटक करण्यात आली आहे. दंगलीनंतर गांधीनगर येथील दोन आरोपींना क्रांती चौक पोलीसांनी अटक केली. या आरोपींना तत्काळ जामिनावर सोडा, अशी मागणी शिवसेनेचे माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांनी केली. ते रविवारी रात्री 11 वाजेच्या दरम्यान क्रांती चौक पोलीस स्थानकात गेले आणि त्यांनी आरोपींना सोडण्यास सांगितले. पण कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचार्यांनी आरोपींना सोडण्यास असमर्थता दर्शवली. यावर जैस्वाल यांनी पोलीस स्थानकात गोंधळ घालत तेथील साहित्याची तोडफोड केली. या प्रकरणी माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांच्यावर 353, 332, 504 ,506, 427 कलमासह शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.