पुलवामामध्ये दहशतवाद्यांचा पोलिसांवर हल्ला
पुलवामा - दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवरील हल्ल्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. सोमवारी दहशतवाद्यांकडून पोलिसांवर आणखी एक हल्ला झाला आहे. हा हल्ला जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील शादीपोरा भागात झाला. सुरक्षा दलांनी देखील दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. या हल्लयामध्ये कुणालाही दुखापत झाली नाही. केंद्र सरकारने रमजानच्या काळात कोणतीही दहशतवादविरोधी मोहीम राबवू नये, असा सुचना केल्यानंतर झालेल्या हल्ल्यांपैकी हा हल्ला आहे. गृहमंत्रालयाने हा निर्णय घेताना म्हटले होते, की हा निर्णय शांतताप्रिय मुस्लिम लोकांना रमजानच्या काळात शांततापूर्ण वातावरण मिळावे, म्हणून घेण्यात आला आहे. यावेळी गृहमंत्रालयाने हेही स्पष्ट केले होते, की जर समोरून हल्ला झाला तर त्याला प्रत्युत्तर देण्याचा आणि निष्पापांचा जीव वाचवण्यासाठी कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार सैन्याकडे असेल.