Breaking News

वॉटर कप स्पर्धेमध्ये लोक कलावंतांचा सहभाग पो.नि. पांडुरंग पवार यांचेसह पोलिस कर्मचारीही श्रमदानामध्ये सहभागी

जामखेड / ता. प्रतिनिधी । 25 -  तालुक्यातील सावरगाव येथे कलावंतांसह पोलिस कर्मचार्‍यांनी श्रमदान करण्यास पुढाकार घेतला. सिनेअभिनेते अमिर खान यांनी पाणी फाऊंडेशन अंतर्गत सुरू केलेली वॉटर कप स्पर्धा 2018, यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्याच्या काही गावांनी सहभाग घेतला असून, सावरगांव या गावाने देखील सहभाग घेतला आहे. या गावात सोमवारी सायंकाळी 5.00 वाजता जामखेड तालुक्यातील ग्रामीण विकास केंद्र, लोक कलावंत महिला, जामखेड पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक व कर्मचारी, नगरसेवक आदी प्रतिष्ठित नागरिकांसह गावातील वयोवृद्धांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेऊन पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी वाचवा असा जयघोष करत श्रमदान केले. श्रमदान करण्यापुर्वी लोक कलावंत महिलांनी आपल्या अदाकारींनी उपस्थित नागरिकांची मने जिंकून वॉटर कप स्पर्धेत आम्हीदेखील सहभागी होऊन श्रमदान करू शकतो असे प्रत्यक्ष काम करून दाखवून नागरिकांमध्ये चेतना निर्माण करून दिली. जामखेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार, पो.उपनिरीक्षक नामदेव सहारे यांनीदेखील पाणी फाऊंडेशनच्या या उपक्रमात आपल्या टिमसह सहभाग नोंदवून आपणदेखील समाजाचे देणे आहोत, आपणही श्रमदान करून पाणी अडविले पाहिजे अशी भावना सर्व कर्मचारी यांच्या मनात रूजवत सर्वांनी श्रमदान केले. श्रमदानात अलका जाधव, जया अंधारे, ज्योती पवार, जया अंधारे, उमा जाधव, संजीवनी जाधव, मंदा चंदन, राजश्री जाधव, विशाल जाधव, नगरसेवक गुलचंद अंधारे, अमित जाधव, सनी जाधव व संतोष गर्जे आदींसह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. शेवटी सावरगांवचे सरपंच व पाणी फाऊंडेशनचे तालुका समन्वयक दहिफळे यांनी उपस्थित सर्वांचे श्रमदान केल्याबद्दल आभार मानले.