Breaking News

दखल - बबनदादांची खदखद

बबनराव पाचपुते हे राज्याच्या राजकारणातलं बडं प्रस्थ. पाचपुते यांची टीकाही संयमी असते. ते कुणावर उगीच आगपाखड करीत नाहीत. वारकरी संप्रदायात वावरत असताना त्यांना कदाचित पुढचं दिसत असावं. भाजप हा देशात अतिशय वेगानं वाढणारा पक्ष असताना या पक्षात सारं काही आलबेल नाही. इतरांपेक्षा वेगळा पक्ष असल्याचा गवगवा हा पक्ष करीत असला, तरी हा पक्ष इतरांसारखाच आहे. किंबहुना या पक्षातील गटबाजी चांगलीच वाढली आहे. ज्येष्ठ नेत्यांतील समन्वयाअभावी तर कर्नाटकमध्ये आमदारांची जुळवाजुळव क रण्यात पक्षाला अपयश आलं. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्यामुळं तर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची कानउघाडणी केली. 

शत्रुघ्न सिन्हा यांच्यासारखे पक्षात अनेक लोक आहेत, जे भाजपत चालू असलेल्या घटनांविरोधात सातत्यानं भाष्य करीत असतात. महाराष्ट्रात हीच स्थिती आहे. एकीकडं मुख्यमंत्र्यांसह सर्व नेते भाजपचे मंत्री किती वेगानं काम करतात, लोकांच्या प्रश्‍नाशी कसे बांधील आहेत, हे कंठशोष करून सांगत असताना बबनरावांसारख्यांनी राज्य सरकारमधील मंत्री लोकांच्या प्रश्‍नांकडं लक्ष देत नाहीत. प्रदेशाध्यक्षांना कार्यकर्त्यांचे प्रश्‍न ऐकून घ्यायला वेळ नाही. त्यामुळं सरकार आणि पक्षातील शिस्त बिघडली आहे, असा जो सूर आळवला आहे, तो सरकारला घरचा आहेर आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी याच पाचपुते यांनी सरकारच्या शेतीविषयक कामगिरीचे गुणगान केले होते. सरकार कसं चांगलं काम करीत आहे, याबाबतचं प्रशस्तिपत्रक दिलं होतं. तेच बबनदादा आता बेसूर का बोलायला लागले आहेत? अर्थात दादांच्या सुरात सूर मिसळण्याची अनेकांची इच्छा आहे ; परंतु तसं धाडस होत नसावं.
महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची सध्या निवडणूक चालू आहे. यापूर्वी ही निवडणूक कधीच पक्षीय पातळीवर लढविली जात नव्हती. संघटनांना पक्ष पाठिंबा देत ; परंतु आता भाजपनं पक्षीय पातळीवर निवडणूक लढवायचं ठरविलं आहे. माजी मंत्री विजय नवल पाटील यांच्या मुलाला भाजपनं उमेदवारी दिली आहे. वर्षानुवर्षे भाजपचे कार्यकर्ते असलेले सुनील पंडित हे ही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळं पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येही कोणती भूमिका घ्यायची, असा प्रश्‍न पडला असण्याची शक्यता आहे. सध्या तरी कार्यकर्ते दोघांच्याही प्रचारात फिरताना दिसतात. पक्षीय शिस्तीचं असं खोबरं झालं आहे. पाचपुते यांच्या बोलण्याला तो संदर्भ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या राष्ट्रवादीतून बबनदादा बाहेर पडले, त्याच राष्ट्रवादीच्या उमेदवारांना भाजप निवडून आणण्यासाठी पुढाकार घेत असेल, तर दादांच्या मनाला किती वेदना होत असतील,याचा कुणी विचार करणार आहे, की नाही ? त्यामुळं तर पाचपुते यांनी स्वपक्षातील बेशिस्तीवरच हल्लाबोल केला असावा. कार्यकर्ते त्यामुळं विचलीत झाले असतील, तर तो त्यांचा दोष नाही. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं वादाच्या भोवर्‍यात सापडत आहेत. त्यांच्याच उपस्थितीत दादांनी राज्याचे मंत्री लोकांमध्ये फिरत नाहीत. केंद्रीय मंत्री जिल्ह्यात येतात, मात्र राज्यातील मंत्री कधी जिल्ह्यात फिरकलेले दिसले नाहीत. सामान्य कार्यकर्त्यांना मंत्री भेट देत नाहीत. प्रदेशाध्यक्षही भेटत नाहीत. कार्यकर्त्यांचे ऐकूनही घेत नाहीत. ते नेहमीच संपर्काच्या बाहेर असतात, हे काही पक्षाच्या दृष्टिने चांगलं लक्षण नाही, असं जे म्हटलं, त्याचा अर्थ त्यांचा नाराजीचा सूर कोणाविरुद्ध होता, हे वेगळं सांगायची गरज नाही.
बबनरावांनी विधानसभेच्या निवडणुकीची तयारी चालविली आहे. गेल्या चार वर्षांपासून केंद्रात व राज्यात स्वपक्षाचं सरकार असताना त्यांना या सरकारचा फार फायदा झालेला नाही. बबनरावांचा पराभव करून निवडून आलेल्या आमदार राहुल जगताप यांच्यासाठी पालकमंत्री प्रा. राम शिंदे पायघड्या घालायला लागले आहेत. पालकमंत्र्यांना लोक सभेत जायची घाई झाली आहे. त्यामुळं ते त्यांच्या सोईचं राजकारण करताहेत, असा दादांचा ग्रह झाला आहे. त्यामुळं तर त्यांनी पालकमंत्री आणि ते ज्या सरकारचा भाग आहे, त्या राज्य सरकारला टार्गेट केलं असावं. श्रीगोंदे तालुक्यासाठी पाचशे मेगावाट वीज निर्मितीचे प्रस्ताव तयार करून सरकारडं पाठविले ; मात्र त्याला मंजुरी दिली नाही किंवा साधं उत्तर दिलं नाही. मंजुरी मिळाली असती तर गावं विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली असती. त्याचा लाभ निवडणुकीतही झाला असता ; मात्र आता तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे, असं म्हणण्याची वेळ आली आहे. त्यामुळं राज्यात सरकार असूनही पक्षातील लोकांच्या काय कामाचं? अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली. मी तर आता आमदार होणार आहे. सर्व तयारी करून ठेवली आहे, असं सांगताना सरकारच्या भरवशावर नसल्याचं पाचपुते यांनी सांगितलं. त्याचा दुसरा अर्थ पाचपुुते सत्ताधारी भाजपचे उमेदवार असणार नाहीत, असाही होतो. अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरं जायची त्यांची तयारी असावी. त्यासाठी पक्ष व सरकारला लक्ष्य करून ते तशी जनता व कार्यकर्त्यांची मानसिकता तयार करीत असावेत, असं मानण्यास जागा आहे.
मेळाव्याची वेळ पक्षानं सकाळी 11 वाजता दिली होती ; मात्र तब्बल चार तासांनी कार्यक्रम सुरू झाला. त्यामुळं पक्षाची शिस्त गेली कुठं? असा सवाल करीत लोक ांपर्यंत पोहचता आलं, तरच लोक तुम्हाला विचारणार आहेत. सध्या पक्षातील सगळेच हारल्यासारखेच वागत आहेत. मनानं हार मानू नका. गुलाल घेवून फिरायचं, की बुक्का घेवून हे तुम्ही ठरवा. संपर्क वाढला पाहिजे. त्यासाठी काम करा. पक्षानं दिलेली शिस्त पाळा, असा सल्लाही पाचपुते यांनी दिला. सुजय विखे यांच्यावर टीका करताना खासदार दिलीप गांधी यांना लक्ष्य करायलाही बबनराव विसरले नाहीत. प्रत्येकाला खासदार व्हायचं आहे ; मात्र काम कोणालाच नको आहे. प्रत्येकानं आधी काम केलं पाहिजे, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.