Breaking News

नाशिक: भद्रकालीतील अनैतिक व्यवसायांवर छापा

नाशिक, दि. 3, मे - नाशिकच्या भद्रकाली परिसरात पिंपळचौकातील ठाकरे गल्ली येथे अनैतिक व्यवसाय अड्ड्यावर छापा टाकून 17 पीडित महिलांची सुटका केली, तर महिलांंना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. शानुबाई कालप्पा हाडगीलकर (50) आणि शोभा दिसराम पवार (40, दोघी रा. पिंपळचौक, ठाकरेगल्ली) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. 



यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार भद्रकालीच्या ठाकरे गल्ली परिसरातील जुनाट घरांमध्ये महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करून शानुबाई आणि शोभा या दोघीही पैसे कमवत असल्याची माहिती भद्रकाली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये 17 महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करण्यात येत असल्याचे व त्याद्वारे संशयित पैसे कमवत असल्याचे उघडकीस आले.
त्यानुसार पोलिसांनी 17 पीडित महिलांची सुटका करून दोन संशयित महिलांना अटक केली आहे. या दोघींविरोधात अनैतिक देहव्यापार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वैशाली शिंदे करत आहेत.