Breaking News

गडकरींच्या विरोधात शिवसेना उतरवणार उमेदवार ?


नागपूर, दि. 08, मे - येत्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री आणि भाजपचे विदर्भातील सर्वात मोठे नेते नितीन गडकरी यांच्या विरोधात शिवसेना आपला उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याची माहिती विश्‍वसनिय सूत्रांनी दिली. यासंदर्भात जमीन चाचपणीसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे येत्या 11 मे रोजी नागपुरात येऊन जमीन चाचपणी करणार आहेत. 

यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार शिवसेना यापुढे सर्व निवडणुका स्वबळावर सल्याची घोषणा ठाकरे यांनी केली आहे. त्यासाठी विदर्भातील संघटनात्मक बळ व नेत्यांचे मनोगत जाणून घेण्यासाठी बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला संजय राठोड परिवहन मंत्री दिवाकर रावते, सर्व जिल्ह्यांचे संपर्क प्रमुख, खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर उपस्थित राहणार आहेत.

विदर्भातील लोकसभेच्या 10 जागा असून त्यापैकी आतापर्यंत शिवसेनेने केवळ 4 जागांवर लढत दिली आहे. रामटेक, अमरावती, यवतमाळ-वाशिम व बुलडाणा या चारही जागांवर सध्या शिवसेनेचे खासदार आहेत. उर्वरित 6 जागांवर सेनेला उमेदवार शोधावे लागणार आहेत. यात अकोला, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा-गोंदिया या मतदारसंघांचा समावेश आहे. यापैकी अकोला वगळता इतर मतदारसंघांमध्ये शिवसेनेची संघटनात्मक बांधणी भक्कम नाही. या मतदारसंघांमध्ये भाजप मजबूत स्थितीमध्ये आहे. शिवसेनेच्या संघटन बांधणीचा आढावा घेतला जाणार आहे. थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना आव्हान देऊन भाजपला धक्का देण्याचा सेना नेत्यांचा मानस असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे येत्या काही दिवसात नवी राजकीय समिकरणे आकाराला येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.