Breaking News

आ. बच्चू कडू यांची 14 मेपासून आसूड यात्रा


अकोला, दि. 08, मे - केंद्र व राज्यातील सत्ताधारी भाजप सरकारचे शेतकरी, सर्वसामान्य जनतेच्या विरोधातील धोरणांवर प्रहार करण्यासाठी आ. बच्चू कडू यांनी पुन्हा आसूड उगारला आहे. 14 मे रोजी यवतमाळ जिल्ह्यातील दाभडीपासून सुरू होणार्‍या आसूड यात्रेच्या माध्यमातून बच्चू कडू सरकारविरुद्ध पुन्हा दंड थोपटणार असल्याने राजकीय वर्तुळात ही यात्रा पुन्हा चर्चेचा विषय ठरली आहे.
 
वाढती महागाई, डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर, कुटूंबांच्या पालन-पोषणाची चिंता, निसर्गाची अवकृपा आणि सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा आत्महत्येकडे वळला आहे. देशातील शेतकरी, मजुर, कामगारांसह सर्वसामान्य जनतेला अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत केंद्र व राज्यात भाजप सरकार सत्तेवर आले. मात्र, सत्ता मिळाल्यावर सरक ारने जनतेला दिलेल्या आश्‍वासनांची पुर्तता केली नसल्याने प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आ. कडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात यापूर्वी आसूड यात्रा काढली होती.
 
या यात्रेत शेतकर्‍यांसह सर्वसामान्य जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने ही यात्रा गाजली होती. सरकारच्या शेतकरी, सर्वसामान्यांच्या विरोधातील धोरणांवर प्रहार करण्यासाठी आ. कडू यांनी पुन्हा एकदा सरकारविरुद्ध आसूड उगारला आहे. 14 मे रोजी यवतमाळ जिल्ह्यातील दाभडीपासून आसूड यात्रेला सुरूवात होणार असून 18 मे रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या जालन्यातील भोकरदनमध्ये या यात्रेची सांगता होणार आहे.