Breaking News

नोटिसीमुळे ‘मुळानगर’चे रहिवाशी आक्रमक


राहुरी विशेष प्रतिनिधी : तालुक्यातील मुळानगर येथील शासकीय जागेसह शासकीय निवासस्थानांत गेल्या ५० हून अधिक वर्षांपासून राहत असलेल्या कुटुंबांना निवासस्थाने खाली करण्याबाबत देण्यात आलेल्या नोटिसांमुळे येथील रहिवाशी चांगलेच आक्रमक झाले आहेत. या नोटिसा बेकायदेशीर असल्याचे येथील नागरिकांचा आरोप आहे. यासंदर्भात आज {दि. २३ } सकाळी ११ वाजता ग्रामसभा घेण्यात आली.
मुळानगर, वरवंडी ही ग्रुप ग्रामपंचायत असून ग्रामपंचायतीने ठराव केला आहे. यामधे झोपडपट्टी घोषित करणे, घोषित झोपडपट्टीला मंजुरी देणे, ले आउट करण्यास मंजुरी देणे, जमीन मोजणीस मंजुरी देणे, ग्रामस्थांना ना हरकत दाखले देणे, औरंगाबाद खंडपीठात दाखल असलेल्या जनहित याचिकेत दिलेल्या आदेशाचे पालन करणे हे ठराव या ग्रामसभेत मंजूर करण्यात आले.

शासननिर्णयानुसार {दि. ४ एप्रिल २००२} शासकीय जागेत झालेली अतिक्रमण नियमित करणे आणि त्या संदर्भात दिलेल्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे, असे असतांनाही मुळा पाटबंधारे खात्याने न्यायलयाच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी या ग्रामसभेत बोलतांना केला. मुळानगर येथे गेल्या अनेक वर्षांपासून सुमारे ३०० कुटूंबे शासकीय निवासस्थानात राहतात. यातील अनेक कुटूंबे धरणाचे काम सुरू झाल्यापासून येथे राहत आहेत. कृषि विद्यापिठाचे कर्मचारीही अनेक वर्षे या ठिकाणी राहत आहेत. 

मुळानगरमधील लोकांची सुमारे २ हजार लोकसंख्या आहे. सध्या मुळा पाटबंधारे खात्यातील सेवानिवृत्त कर्मचारी, भूमिहीन, शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, मोलमजुरी करणारे कर्मचारी, मच्छिमार असून त्यांच्यापासून धरणाच्या सुरक्षिततेला कोणताही धोका नाही. धरण पाहण्यासाठी अनेक पर्यटक येतात. त्यांच्या खरेदीवर लहान सहान व्यवसाय करून या स्थानिक लोकांची उपजिविका चालते. अनेक वेळा धरणात बुडालेल्या पर्यटकांना बाहेर काढून कित्येकांचे या लोकांनी प्राण वाचविले आहेत. ज्यांनी धरण उभारणीत काम करत योगदान दिले, ज्यांचे पर्यटकावर उपजिविका चालते, ज्यांच्यापासून ५० वर्षांत धरणाच्या सुरक्षिततेला धोका पोहचला नाही. अशा कुटुंबामुळे धरणाला कधीच धोका होणार नाही, असे असतांना धरणाच्या सुरक्षिततेचे कारण देत नागरिकांना नोटिसा देणे, हे अत्यंत चुकीचे असल्याचे मत ग्रामसभेतील नागरिक व महिलांनी यावेळी मांडले.

यावेळी सरपंच मनिषा ढगे, ग्रामसेवक शेख, सुभाष गायकवाड, अंकुश बर्डे, प्रविण लोखंडे, सलिम शेख, मंदा मिसाळ, साईनाथ कदम, ज्येष्ठ नागरिक शामराव पंडित, शालिनी पोपळघट, जालिंदर आडसुरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

कायद्याच्या तरतुदींनुसार निपटारा व्हावा. 
सदर वाद हा दोन ठेकेदारांचा असून या वादात स्थानिक नागरीकांना भरडण्याचे काम मुळा धरण प्रशासनाने सुरु केले आहे. जाणीवपूर्वक नागरिकांना जागा खाली करण्याच्या नोटिसा पाठवून गोंधळ निर्माण केला जात आहे. या प्रकाराची चौकशी व्हावी. शेवटी घटना महत्वाची असून कायद्याच्या तरतुदींनुसार या समस्येचा निपटारा व्हावा. 
(प्रविण लोखंडे, मुळानगर स्थानिक नागरिक)