कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे क्लिष्ट गोष्टींवर मात : डॉ. देशपांडे
अहमदनगर : शास्त्रज्ञांनी लावलेल्या विविध प्रकारच्या शोधांमुळेच मानवी जीवन सुखकर व प्रगतशील झाले. समाजाने शास्त्रज्ञांप्रती कृतज्ञ राहिले पाहिजे. संगणकामध्ये विशिष्ट प्रोग्रामद्वारे मानवी मेंदूप्रमाणे विचारप्रणाली विकसित करून सारासार विचार करण्यास प्रवृत्त केले जाते. कृत्रिम बुद्धिमत्ता ही विज्ञानाचीच एक शाखा असून त्याद्वारे अतिशय क्लिष्ट गोष्टींवर मनुष्याने मात केली, असे प्रतिपादन येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार देशपांडे यांनी केले.
इंस्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्सच्या अहमदनगर स्थानिक केंद्र व भारत संचार निगम लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने मागील आठवड्यात गुरुवारी { दि. १७ } भारत संचारच्या सभागृहामध्ये जागतिक दूरसंचारदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्वांसाठी सकारात्मक वापर’ या संकल्पनेवर हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी भारत संचार निगम लि. च्या अहमदनगर दूरसंचार विभागाचे मुख्य सरव्यवस्थापक अजातशत्रू सोमाणी यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होते. निवृत्त उपजिल्हाधिकारी व हॅम रेडिओ विशेषज्ञ दत्ता देवगावकर सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. इन्स्टिट्यूटशन ऑफ इंजिनिअर्सचे अध्यक्ष अविनाश कुलकर्णी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा स्मार्टफोन, यंत्र-शिक्षण, रोबो, सीसीटीव्ही कॅमेरा आदींमध्ये होणारा वापर व त्याचे मानवी जीवन सुसह्य करण्यासाठी होणारे उपयोग डॉ. देशपांडे यांनी विशद केले. स्मार्टफोनमधील गुगल अॅप्सचे विविध अप्लिकेशन त्यांनी प्रात्यक्षिकांसह विशद केले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मर्यादाही त्यांनी स्पष्ट केल्या. दत्ता देवगावकर म्हणाले, हॅम रेडिओ हे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अद्वितीय पाऊल आहे. त्याचा प्रसार होणे गरजेचे आहे. मुख्य अतिथी अजातशत्रू सोमाणी यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवी प्रगती होत असतानाच त्यामुळे मानवाची नैसर्गिक बुद्धिमत्ता लोप पावत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग मानवाच्या सुरक्षेसाठी व विकासासाठीच व्हावा, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. इन्स्टिट्यूटशन ऑफ इंजिनिअर्सचे अध्यक्ष अविनाश कुलकर्णी यांनी संस्थेविषयी माहिती दिली.
प्रारंभी कार्यक्रमाच्या सुरुवातीला इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सचे मानद सचिव आर. पी. वायकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यकारिणी सदस्या सुमित्रा सारडा यांनी सूत्रसंचलन केले. कार्यक्रमास अहमदनगर दूरसंचार विभागाचे उप-सरव्यवस्थापक एम. यू. खान, यशस्वी बजाज, माजी मानद सचिव राजकुमार मुनोत, भारत संचारचे तांत्रिक अधिकारी व कर्मचारी, संस्थेचे सभासद मोठया संख्येने उपस्थित होते. माजी मानद सचिव हरिशचंद्र थिगळे यांनी आभार मानले.
