विधानसभा निवडणूक लढवणारच : संजय शिंदे
सोलापूर, दि. 10, मे - मी कोणतीही तडजोड करणारा नेता नाही, हे अख्ख्या जिल्ह्याला माहीत आहे. त्यामुळे अफवांकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी केले. तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासावर भर देत आहोत. मात्र, 2014 मध्ये विधानसभेला निवडून दिले असते तर तालुक्याचा विकास झाला असता, असेही त्यांनी म्हटले. वांगी क्रमांक दोन येथे आयोजित बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
शिंदे म्हणाले, माझ्याविषयी अफवा पसरवल्या जात आहेत. परंतु मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही. मी विधानसभा निवडणूकच लढवणार आहे. दरम्यान, सुदैवाने मला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळाले. त्याचा तालुक्याच्या विकासासाठी वापर करत आहे. आतापर्यंत तालुक्यातील तीन ते चार गावे वगळता इतर सर्व गावांना निधी दिला आहे. मी गटातटाचे राजकारण करत नाही. माझ्याकडे आलेल्या लोकांची कामे करणे हेच माझे ध्येय आहे. तालुक्यातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. विकासाचे राजकारण करत राहू.