कुडलसंगम तीर्थक्षेत्राला ब दर्जा, दीड कोटीचा निधी
सोलापूर, दि. 10, मे - राज्य निकष समितीच्या बैठकीत कुडलसंगम तीर्थक्षेत्राला ब दर्जा देण्यात आला. तसेच विकासासाठी 1 कोटी 48 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. कुडलसंगम येथे प्राचीन संगमेश्वर मंदिर आहे. या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा व विकासासाठी निधी मिळावा, यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पाठपुरावा केला होता. यामुळे विकासकामांसाठी एक कोटी 48 लाखांचा निधी मिळाला. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तीर्थक्षेत्राच्या ब दर्जाबरोबरच विकासासाठी निधी देण्यात आला आहे.
भीमा आणि सीना नदीकाठावर कुडलसंगम येथे प्राचीन संगमेश्वर मंदिर आहे. येथे मराठीतील शिलालेख, प्राचीन कालीन कलाकुसरीचे दर्शन घडवणारी मंदिरे आहेत. यामुळे श्रावण महिन्यासह अमावास्या, पौर्णिमा, गुढीपाडवा, महाशिवरात्री, प्रत्येक सोमवारी भाविकांची मोठी गर्दी असते. वाहनतळ बांधण्यासाठी 33 लाख 92 हजार, मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसवणे 34.88 लाख, नदीकडेला संरक्षक भिंत बांधणे 30.52 लाख, सार्वजनिक शौचालय बांधणे 24.59 लाख,सार्वजनिक शौचालय बांधणे 19.36 लाख, मंदिर परिसरात पथदिवे बसवणे 5.12 लाख रुपये निधी मिळाला आहे. यामुळे ग्रामस्थांसह भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे.