विद्यापीठाची वेबसाईट हॅक करुन पेपर फोडल्याप्रकरणी नाशकातील दोन विद्यार्थी अटकेत
नाशिक, दि. 08, मे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वेबसाईट हॅक करून बीएसएसी विज्ञान द्वितीय वर्गाचा लेखाकृती बीजगणिताचा पेपर आदल्या दिवशी मिळवून सोशल मीडियाद्वारे प्रसारित करणारे नाशिक शहरातील कर्मवीर काकासाहेब वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातील आयटीच्या दोघा विद्यार्थ्यांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे.
आदेश चोपडे (21) व चिन्मय अटराव्हलकर (22) अशी वेबसाईट हॅक प्रकरणात अटक केलेल्या दोघांची नावे आहेत़ सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या बीएससी द्वितीय वर्षातील लेखाकृती बीजग णित या विषयाचा पुणे, नगर व नाशिक येथे 28 एप्रिल रोजी पेपर होता़. मात्र, 27 एप्रिल रोजी रात्रीच हा पेपर सोशल मीडिया (व्हॉट्स अॅपवर) व्हायरल झाला व दुसर्या दिवशीचा पेपर व व्हायरल झालेला पेपर हा तंतोतंत सारखाच होता़ विद्यापीठ अधिसभा सदस्य अमित पाटील व त्यांचे शिष्टमंडळ तसेच नाशिकमधील आम आदमी पक्षाचे जितेंद्र भावे यांनी पुणे विद्यापीठ उपकेंद्रातील कनिष्ठ सहायक योगेश सोनार यांच्याकडे पेपरफुटीबाबत निवेदन देऊन तक्रार केली़ बिटको महाविद्यालयात जाऊन व्हायरल प्रश्नपत्रिकेची खातरजमा करण्यात आली व तेथील प्राचार्यांनीही प्रश्नपत्रिका ही सारखीच असल्याचे विद्यापीठास मेलद्वारे कळविले होते़.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ नितीन करमळकर यांनी केटीएचएमचे प्राचार्य डॉ़ व्ही़ बी़ गायकवाड, हिरे महाविद्यालयाचे प्राध्यापक ए़ व्ही़ पाटील, विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे समन्वयक डॉ़ राजेंद्र तलवारे यांची त्रिसदस्यीय समिती चौकशीसाठी नेमली होती़ या समितीने शहरातील विविध परीक्षा केंद्रांना भेटी देऊन विद्यार्थ्यांकडे चौकशी केल्यानंतर क़ का़ वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातील आयटीचे तृतीय व चतुर्थ वर्षातील विद्यार्थी चोपडे व अटराव्हलकर यांनी विद्यापीठाची वेबसाईट हॅक करून मिळविल्याचे समोर आले़ त्यांनी विद्यापीठाची वेबसाईट कशाप्रकारे हॅक केली व प्रश्नपत्रिक ा मिळविली हे लेखी स्वरूपात लिहून दिले़ या त्रिसदस्यीय समितीने विद्यापीठास कळविल्यानंतर वेबसाईट हॅक करून सोशल मीडियावरून प्रश्नपत्रिका व्हायरल करणार्या विद्यार्थ्यांविरोधात विद्यापीठाने पोलिसांत तक्रार नोंदविण्याचा निर्णय घेतला़.
