Breaking News

पालकमंत्र्यांच्या तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची वनवण तालुका टँकरमुक्त ही पालकमंत्र्यांची घोषणा ठरली फोल

जामखेड /ता. प्रतिनिधी । तालुक्यातील अनेक गावांतील नागरिक आजमितीस भीषण पाणी टंचाईचा सामना करत आहेत. अनेक गावांतील नळयोजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे महिलांना दोन-दोन किलोमीटर पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी टँकर सुरू करण्यायोग्य परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे तालुक्यातील विविध गावांमध्ये धरण उशाला आणि कोरड घषाला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुका टँकरमुक्त ही पालकमंत्री राम शिंदे यांची घोषणा घोषणाच ठरली आहे. तालुक्यात मात्र पाण्यासाठी महिलांना वणवण भटकंती करावी लागत आहे. 

पालकमंत्री राम शिंदे यांनी तालुक्यात अनेक ठिकाणी जाहीर सभेत सांगितले आहे की, दोन वर्षापासून तालुका टँकरमुक्त झाला आहे. परंतू वास्तव काही वेगळेच आहे. आजमितीस पंचायत समितीकडे मुंजेवाडीचा टँकरचा प्रस्ताव दाखल झाला आहे. दोन दिवसात आणखी काही गावांचा टँकरचा प्रस्ताव दाखल होणार आहे. सध्या तालुक्यातील साकत, नायगाव, दिघोळ, कुसडगाव, बांधखडक, पोतेवाडी, चोभेवाडी या सात गावांतील पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने विहिरी, कूपनलिका अधिग्रहण केल्या आहेत. 
साकतमध्ये तर धरण उशाला आणि कोरड घषाला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून नळ योजना बंद आहे. लोक दोन-दोन की.मी अंतरावरून पिण्याचे पाणी आणत आहेत. पाणी पुरवठा करणारी विहिर कोरडी पडली आहे. कुपनलिका अधिग्रहण केली आहे. परंतू कुपनलिकेचे पाणी गावाला पुरत नाही. लोकांना पाणी शेंदून न्यावे लागत आहे. गावाच्या जवळ तीन किलोमीटर अंतरावर महासांगवी प्रकल्प आहे. या प्रकल्पात भरपूर पाणी आहे. परंतु प्रशासनाचा ढिसाळ कारभार व राजकीय उदासिनता यामुळे साकत गावाची अवस्था धरण उशाला व कोरड घषाला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 
तालुक्यातील लोणी परिसरात पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली असुन परकड वस्ती, बामदळे वस्ती, शेंडकर वस्ती, मुस्लिम वस्ती, दलित वस्ती येथील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून, येथील पाणी पुरवठ्याची व्यवस्था त्वरीत न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा येथील नागरिकांनी जामखेड गट विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. 
लोणी येथे गेली दोन ते तीन महिण्यापासुन पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असुन, बामदळे वस्ती येथील पाण्याची टाकी दोन वर्षापासुन बंद असल्याने येथील पाणी पुरवठा खंडीत झाला आहे. तसेच परकड वस्ती येथे पाण्यासाठी टाकी आहे, मात्र येथील पाईप लाईन तोडून टाकल्याने येथील पाणी पुरवठा पूर्णपणे खंडीत झाला असल्याने येथील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नवीन पाईप लाईनच्या जोडणीअगोदर महिला बचत गटाची पाईप लाईन तोडून टाकण्यात आल्याने येथे पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. पाईप लाईन तोडणार्‍यांवर कारवाई करून पाण्याची व्यवस्था करतो असे ग्रामसेवक नेहमीच सांगतात. मात्र ते परत गावात देखील आले नाही. अद्यापपर्यंत त्यांनी कोणावर कोणतीच कारवाई केली नसुन, पाणी पुरवठा देखील  सुरळीत केला नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्वरीत न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा येथील नागरिकांनी गट विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला असुन या निवेदनावर वामन गंगावणे, श्रावण गंगावणे, गंगाधर बामदळे, रघुनाथ परकड, सुंदर घुंमरे, शिवाजी बामदळे, बिबिशन सुरवसे, आत्माराम कानडे यांच्यासह नागरिकांच्या सह्या आहेत.


पालकमंत्री राम शिंदे यांनी अनेक जाहीर सभेत बोलताना सांगितले होते की, जलयुक्त शिवारामुळे तालुका टँकरमुक्त झाला आहे. परंतु वास्तव अधिक भीषण आहे. लहान थोर व अबाल-वृध्दांना महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. मे अखेरीस जवळपास दहा गावांचे पाण्यासाठी टँकरचे प्रस्ताव दाखल होतील असा अंदाज आहे.