Breaking News

महाराष्ट्राला राष्ट्रीय तंत्रज्ञानाचे दोन पुरस्कार


नवी दिल्ली : महाराष्ट्राला राष्ट्रीय तंत्रज्ञानाचे दोन पुरस्कार आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आले.
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे विज्ञान भवन येथे ‘20 व्या तंत्रज्ञान दिवसा’ चे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ.हर्ष वर्धन उपस्थित होते. तंत्रज्ञान विकास बोर्डचे अध्यक्ष तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रा.आशुतोष शर्मा आणि इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

तंत्रज्ञान आधारित उत्पादनाच्या यशस्वी व्यावसायिकरणासाठी पुरस्कार
पालघर जिल्ह्यातील वसई पश्चिम येथील एएनटीएस सिरॉमिक प्रायवेट लि. या कपंनीला सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग श्रेणीतील द्वितीय श्रेणीचा पुरस्कार मिळाला. झिरकोनिया सिरॉमिक उत्पादने आणि कार्बन सल्फर पात्र बनविण्यासाठी राष्ट्रपती श्री.कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार कंपनीचे संचालक सब्यासची रॉय आणि अश्विनी जैन यांनी स्वीकारला. 15 लाख रूपये रोख आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

झिरकोनिया हा धातू भारतात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र, हा धातू मुख्यत: निर्यात केला जातो. त्यापासून बनलेल्या पक्क्या वस्तू भारतात आयात होतात. या धातुपासून बनणाऱ्या वस्तू अधिक प्रमाणात संरक्षण दलात वापरल्या जातात. झिरकोनिया या धातुपासून संरक्षण दलाला उपयोगी असणाऱ्या वस्तू पुरविणारी एएनटीएस सिरॉमिक प्रायवेट लि. कंपनी ही भारतातील एकमेव कंपनी आहे. त्यांच्या या विशेष कार्याची दखल घेत त्यांना आज राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.