दिव्यांग सहाय्य सेना आणि महासंघाचे आंदोलन
संगमनेर:अपंग सहाय्य सेना व राष्ट्रीय विकास अपंग महासंघाने आपल्या विविध मागण्यांसाठी संगमनेर नगर परिषदेच्या प्रवेशद्वारात आज बुधवारी दि. २ रोजी दिव्यागांनी आंदोलन केले. नियमानुसार पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी बारा हजार रुपये सौरदिवे उपकरण संचासाठी देण्याचे निश्चित झाल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. सकाळीच पालिकेच्या प्रवेशद्वारात दिव्यांगानी बस्थान मांडत प्रवेशद्वार बंद केले. नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांना आंदोलनाची माहिती मिळताच त्यांनी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून चर्चा करून मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या.
मुख्याधिकारी सचिन बांगर यांनी देखील आंदोलकांची भेट घेत, त्यांच्या मागण्यासंदर्भात चर्चा केली. चर्चेनंतर पात्र लाभार्थ्यांना अनुदान दिले जाईल असे आश्वासन बांगर यांनी दिले. प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल आणि संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. शिवसेना अपंग साहाय्य सेनेचे जिल्हाध्यक्ष जालिंदर लहामगे, शिवाजी खुळे, सुनील खरे, कविता सूर्यवंशी, कैलास उदावंत, गोरख रहाणे, शिवाजी कासार आदींनी चर्चेत सहभाग घेतला होता.