Breaking News

शेतक-यांना विश्वासात घेवून काम करा : नागवडे


श्रीगोंदा : उन्हाची तीव्रता अधिक असल्याने पिकांना पाण्याची गरज आहे. त्यामुळे 'कुकडी' कालव्यावरुन उपसा सिंचन करणा-या शेतक-यांनी पिकांसाठी पाणी घेतले आहे. जलसंपदा विभागाने शेतक-यांचे पाईप तोडून नुकसान केले आहे. परिणामी शेतक-यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. जलसंपदा विभागाची कारवाई जुलमी व मनमानीपणाची आहे. याप्रश्नात आम्ही शेतक-यांच्या पाठीशी उभे आहोत. त्यामुळे या विभागाच्या अधिका-यांनी शेतक-यांचे नुकसान न करता त्यांना विश्वासात घेवून काम करावे, असे आवाहन 'नागवडे' कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले.
ते म्हणाले, 'कुकडी'च्या डाव्या कालव्याचे उन्हाळी आवर्तन सध्या सुरु आहे. जवळपास महिनाभरापासून 'कुकडी'चे पाणी तालुक्याबाहेर जात आहे. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने व पिकांची पाण्याची गरज लक्षात घेवून पाण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतक-यांनी उभ्या पिकांना पाण्याची गरज आहे. त्यामुळे शेतक-यांनी 'कुकडी' कालव्यावरुन उपसा करण्यास सुरुवात केली होती. 'कुकडी' कालव्यावरुन उपसा करीत असलेल्या व नसलेल्या कालव्यावरील इलेक्ट्रीक मोटारींचे पाईप जलसंपदा विभागाच्या अधिका-यांनी तोडून फोडून टाकले आहेत. त्यामुळे शेतक-यांचे ऐन उन्हाळ्यात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शिवाय कामाचा खोळंबाही झाला आहे. पाईप तोडण्याची कृती संतापजनक आहे. 

जलसंपदा विभागाच्या अधिका-यांनी शेतक-यांशी सामुहिक व वैयक्तिक चर्चा करुन शेतक-यांना विश्वासात घेण्याची गरज आहे. पाणी वाटपाचे नियोजन केले असते तर ही वेळ आली नसती. शेतक-यांच्या भावना संतप्त आहेत. जलसंपदा विभागाची कारवाई समर्थनीय नाही. तालुक्यातील एरंडोलीपासून तालुक्याच्या सरहद्दीवरील रुईगव्हाण पिरापर्यंतच्या अंतरात जलसंपदा विभागाने शेकडो शेतक-यांचे पाईप तोडून चुकीची कारवाई केली आहे. हे केवळ दुर्दैवी व संतापजनक आहे. जलसंपदा विभागाने शेतक-यांचे नुकसान होईल, अशी कारवाई करु नये. 

चौकट

डी वाय-१३२ ला तात्काळ पाणी सोडा

आवर्तनापूर्वी श्रीगोंद्यात शेतकरी व कुकडीचे अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत डी वाय-१३२ व मागील आवर्तनात पाणी न मिळालेल्या चा-यांना प्राधान्याने पाणी सोडण्याचे जलसंपदा विभागाच्या अधिका-यांनी कबूल केले होते. प्रत्यक्षात येथील शेतकरी अद्यापही पाण्याच्या प्रतिक्षेत आहेत. केवळ एक दिवस पाणी सोडल्याचा फार्स करुन पाणी बंद करण्यात आले आहे. हा शेतक-यांच्या भावनांशी खेळण्याचा अघोरी प्रकार आहे. जलसंपदा विभागाने डी वाय-१३२ व अन्य चा-यांना तातडीने पाणी सोडावे, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.