Breaking News

धडगाव तालुक्यात 64 शाळा तंबाखूमुक्त

नंदुरबार, दि. 28, सप्टेंबर - जिल्ह्यातील धडगाव येथील शाळा तंबाखू मुक्त करून त्याठिकाणी विशेष अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत धडगाव  तालुक्यातील सिसा बीटमधील 64 शाळा तंबाखू मुक्त घोषित झाल्या. त्यामुळे सिसा बीट हे जिल्ह्यातील पहिले तंबाखू मुक्त शाळा बीट ठरले आहे.
येथील पंचायत समितीची नुकतीच मासिक सभा झाली. त्या वेळी ही माहिती देण्यात आली. या वेळी सभापती कालू सिंग पाडवी, गटविकास अधिकारी चंद्रकांत  बोडरे, शिक्षण विस्तार अधिकारी देसले यांच्यासह केंद्रप्रमुख बीटमधील शिक्षक उपस्थित होते. सिसा बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारी ममता पटेल म्हणाल्या की,  सिसा बीटमधील सर्व शाळा तंबाखू मुक्त झाल्या असून बीटमध्ये जिल्हा परिषदेच्या 56, माध्यमिक 2, आश्रमशाळा आदी 64 शाळा आहेत.
या शाळांच्या परिसरात आता कुणीही तंबाखूचे सेवन करत नाही. तंबाखूचे सेवन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देणारे फलक सर्व शाळांमध्ये  लावण्यात आले. शाळांच्या परिसरात तंबाखू विक्रीवरही प्रतिबंध घालण्यात आला असल्याचे त्या म्हणाल्या. गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी मनोगत व्यक्त  केले. या वेळी उपस्थितांनी तंबाखूचे सेवन करण्याची प्रतिज्ञा घेतली. या वेळी शाळांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.