Breaking News

अनुदानित वसतीगृह संघटनेचा आंदोलनाचा इशारा


जामखेड - महाराष्ट्र राज्यातील अनुदानित वसतीगृह अधिक्षक व कर्मचारी यांना वेतनश्रेणी प्रमाणे पगार देण्यात यावा, अन्यथा 29 मे पासून आझाद मैदान मुंबई येथे लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. या मागण्याचे निवेदन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना दिले आहे. 29 मे रोजी आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनात असे म्हटले आहे की, राज्यात सामाजिक न्याय विभागाच्या वतीने चालवण्यात येणार्‍या आश्रम शाळा, अपंग शाळा व शासकीय वसतिगृहात काम करणार्‍या कर्मचारी यांना वेतनश्रेणी प्रमाणे पगार दिला जातो. मात्र काम करणार्‍या अधिक्षक व कर्मचारी यांना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. समान काम, समान दाम या न्यायाप्रमाणे या कर्मचार्‍यांना देण्यात यावी अशी मागणी अनेक वर्षांपासून असुन सरकारने याची दखल घेतलेली नाही.राज्यात सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत 2388 एवढी अनुदानित वसतीगृह आहेत , यामध्ये 8104 कर्मचारी 24 तास सेवा देऊन अल्पशा मानधनावर काम करत आहेत. त्यांना वेतनश्रेणी देण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.

या संघटनेच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत अनुदानित वस्तीगृहावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना वेतनश्रेणी प्रमाणे पगार मिळावा, वस्तीगृहाच्या भोजन अनुदानात वाढ करण्यात यावी, अनुदानित वसतीगृहाचे प्रलंबित मूळ मान्यता आदेश तात्काळ देण्यात यावा. 

या निवेदनावर मारूती कांबळे , सुनिल राठोड , किरणकुमार संग्रामपूरकर, तुकाराम कांबळे, अशिष केंद्रे, अजित राजमाने, बाबूराव दुवे, महादेव चव्हाण, निलेश शिंदे, सुरेश राठोड, जामखेड चे अमर चाऊस आदिंच्या सह्या आहेत.