स्व. राजीव गांधी विज्ञान-तंत्रज्ञान क्रांतीचे जनक : थोरात
संगमनेर प्रतिनिधी
२१ व्या शतकासाठी विकासाचा व आधुनिकतेचा मंत्र असणार्या विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रामधील भारतियांची कामगिरी आज जागतिक पातळीवर अभिमानास्पद ठरली आहे. भारताच्या एकात्मता आणि अखंडतेसाठी बलिदान देणारे भारतरत्न स्व. राजीव गांधी हे या विज्ञान व तंत्रज्ञान क्रांतीचे जनक आहेत, असे प्रतिपादन सहकारमहर्षि भाऊसाहेब थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी केले.
माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या ‘यशोधन’ संपर्क कार्यालयात संगमनेर शहर आणि तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची जयंती आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी नवनाथ अरगडे, के. के. थोरात, सिताराम राऊत, हिरालाल पगडाल, अशोक हजारे, जगन्नाथ आव्हाड, शिवाजी गोसावी, पूंजाहरी दिघे, अनिल सोमणी, शशिकांत दळवी, हरी ढमाले, अनिल राऊत, शिवाजी अरगडे, महेश वाव्हळ, संतोष कर्पे, बाळासाहेब हांडे, विशाल काळे आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, स्व. राजीव गांधी हे तरुणांचे आशास्थान होते. तरुणांना विधायक व रचनात्मक कार्यात प्रेरित करण्याचे महान कार्य त्यांनी केले. भारताला स्वयंपूर्ण व स्वावलंबी बनविण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान आधुनिकीकरणाची जोड दिली पाहिजे. याप्रसंगी काँग्रेसचे पदाधिकारी, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.