Breaking News

संशयित तरुणाला पोलिसांची बेदम मारहाण

श्रीगोंदे प्रतिनिधी 

पोलिसांनी दोन दिवसांपासून अवैध हत्यारे शोध मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेत काष्टी येथील एका तरुणाला संशयित म्हणून श्रीगोंदे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या घराची झडती घेऊनही काहीच सापडले नाही. मात्र श्रीगोंदे पोलिसांच्या पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या तरुणाला अमानुष बेदम मारहाण केली. हा तरुण बेशुद्ध पडल्याने घाबरलेल्या पोलिसांनी या तरुणाला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. दरम्यान, या प्रकरणाचा बोभाटा केल्यास पुन्हा दुसऱ्या गुन्ह्यात अडकविण्याची पोलिसांनी भिती घातल्याने हा तरुण पोलिसांचा ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ सहन करत आहे. 

श्रीगोंदे पोलिसांचे सध्या अवैध व्यवसायिकांच्या विरोधात सुरु असलेले अभियान अभिनंदनास पात्र आहे. मात्र असे असले तरी पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या चांगल्या कामाला त्यांचे सहकारी अनेक वेळा हरताळ फासताना दिसत आहेत. असाच प्रकार काष्टी येथे अवैधरित्या हत्यारे बाळगणारे विरोधात सुरु केलेल्या शोध मोहिमेत आला. काष्टी येथे किराणा दुकान आणि पानांची टपरी असलेल्या एका तरुणाकडे हत्यारे असल्याची अर्धवट माहिती पोलिसांना मिळाली. या तरुणाचे दुकान, टपरी आणि घराची झडती सहाय्यक पोलीस निरीक्षक पोवार यांच्या पथकाने घेतली. मात्र यात काहीच सापडले नाही. चिडलेल्या पोलिसांनी या तरुणाला थर्ड डिग्रीचा वापर करत या तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत हा तरुण बेशुद्ध पडला. यामुळे धास्तावलेल्या पोलिसांनी या तरुणाला श्रीगोंदे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने हा तरुण काही वेळानंतर शुद्धीवर आला. त्यानंतर या तरुणाला भेटण्यासाठी पत्रकार गेले असता पत्रकारांना काही सांगू नको, अन्यथा दुसऱ्या गुन्ह्यात अडकवू, अशी धमकी पोलिसांनी या तरुणाला दिली. 

सहाय्यक पोलीस निरीक्षकाची दबंगगिरी 

श्रीगोंदे पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या कामाचे सगळीकडे कौतुक होत आहे. मात्र याच पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे मात्र आपण पूर्वी एटीएसच्या पथकात असल्याचे सार्वजनिक ठिकाणी मोठ्या थाटात सांगत दबंगगिरी करत आहेत. याच प्रकरणात त्यांच्या दबंगिरीतूनच तरुणाला बेदम मारहण करण्यात आली. या अधिकाऱ्याची बदली करण्याची मागणी श्रीगोंद्यातील सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत.