Breaking News

डॉक्टरांचा दोन वेळचा राऊंड बंद


सोलापूर - सिव्हिल हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालयाचा डॉ. सुनील घाटे यांनी पदभार घेऊन एक वर्षाचा कालावधी पूर्णत्वास येत आहे. तरीही बाह्य रुग्ण विभागातील अपघात विभागामध्ये तत्कालीन अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांचे नाव जैसे थे आहे. मात्र डॉ. पोवार यांनी सुरू केलेले काम व लावलेल्या शिस्तीचा विसर डॉक्टर व नर्सेस यांना पडला आहे. तसेच दोन वेळची डॉक्टरांची राऊंड बंद करण्यात आली आहे. तत्कालीन अधिष्ठाता यांनी रुग्ण व डॉक्टर, नातेवाईक यांच्या सुसंवाद साधण्यावर भर दिला होता. डॉक्टर व नर्सेस यांच्या काय समस्या आहेत, रुग्णांची देखभाल व्यवस्थित होते की नाही याची पाहणी करण्यासाठी सकाळी व संध्याकाळी 9 ते 10 यावेळेत ठरवून दिलेल्या टीमनुसार राऊंड घेतली जात होती.

ही राऊंड घेण्यासाठी प्रत्येकाची टीम तयार केली होती. एका टीममध्ये एक प्रोफेसर, सहायक प्राध्यापक, समाजसेवा अधीक्षक, सुरक्षा रक्षक, शिपाई व नर्सेस आदींचा समावेश होता. ठरवून दिलेल्या दिवशी ही टीम वार्डात जाऊ न राऊंड घेऊन काही त्रुटी अथवा समस्या असतील तर त्यांची नोंदी करत. त्यानंतर त्या नोंदीची वैद्यकीय अधीक्षक व अधिष्ठाता कार्यालयाकडून निपटारा करण्यासाठी प्रयत्न होत होता. परंतु डॉ. पोवार यांची बदली झाल्यानंतर काही महिन्यातच डॉक्टरांना लावलेले अतिरिक्त काम पुन्हा बंद पडले. डॉ. घाटे यांनी अधिष्ठाता पदाचा पदभार घेतल्यानंतर ते स्वत: राऊंड घेतात, मात्र इतर डॉक्टर राऊंड घेत नाहीत.