जलयुक्त शिवार योजनेंतर्गत 2017-18 या वर्षातील कामे पूर्ण करण्यासाठी शासनाकडून जूनअखेरची मुदत
सोलापूर - जलयुक्त शिवार योजनेंतर्गत 2017-18 या वर्षातील कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने जूनअखेरची मुदत दिली आहे. आतापर्यंत विविध विभागांनी 8 हजार 61 कामे पूर्ण केली असून उर्वरित दीड महिन्यात 2412 कामे मार्गी लावयाची आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी आढावा बैठक घेत सर्व कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. यामुळे कामे पूर्ण करण्यात कोणतीही अडचण नाही. ज्या विभागांकडून कामे पूर्ण होणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी यांनी दिला.
सोमवारी जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी जलयुक्त शिवार योजनेची व्हीसीद्वारे बैठक घेतली. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार, रवींद्र माने, रोहयो उपजिल्हाधिकारी कि शोर पवार, जलसंधारणचे कार्यकारी अभियंता मस्के, भूजल सर्वेक्षण विभागाच्या मेघा शिंदे आदी उपस्थित होते. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात 10 हजार 473 कामांसाठी 184 कोटी रुपयांची तरतूद केली होती. यापैकी 4349 कामांवर 40 कोटी रुपये खर्च झाले आहेत. सध्या 100 कोटी 54 लाख रुपयांची 7882 कामे सुरू आहेत. यामध्ये कृषी विभागाची 5917, वन विभागाची 176 तर पाणीपुरवठा विभागाच्या 583 कामांचा समावेश आहे. भूजल सर्वेक्षण विभागास 250 कामे दिली आहेत. अद्याप एकही काम पूर्ण झाले नाही.
