भाजपमध्ये इतर पक्षातून येणार्यांची रांग खूप मोठी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान
मुंबई - इतर पक्षातून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी खूप मोठी रांग आहे. सर्वांचीच नावे आता मी सांगू शकत नाही. त्यामुळे भाजपमध्ये कोण कोण येणार हे वेळोवेळी कळत राहील, अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निरंजन डावखरे यांना गुरूवारी भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली. निरंजन डावखरे यांच्या नंतर आमदार नरेंद्र पाटील हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्याबाबत प्रश्न विचारला असता भाजपमध्ये येण्यासाठी मोठी रांग लागली असल्याचे त्यांनी सांगितले. योग्य त्या लोकांना भाजपमध्ये संधी देण्यात येते. चांगला आणि काम करणारा कार्यकर्ता आणि नेता जर भाजपमध्ये येण्यासाठी तयार असतील तर अशा लोकांचे स्वागत करण्यात येते. निरंजन डावखरे हे देखील काम करणारे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे कोकणात भाजपला ताकद मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. निरंजन डावखरे यांच्या पक्ष प्रवेशवेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती होती.
