Breaking News

पेट्रोल-डिझेल दरवाढ कायम दर वाढतच राहणार असल्याचे केंद्र सरकारचे संकेत

नवी दिल्ली/मुंबई : पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे देशभरातून संताप व्यक्त होत असतांनाच, गुरूवारी देखील दरवाढीचा फटका सर्वांनाच सहन करावा लागला. सलग 11 व्या दिवशी देखील पेट्रोल-डिझेलचे दर वाढत असल्यामुळे केंद्र सरकारची हतबलता देखील समोर आली आहे. दिवसोंदिवस वाढत चालेल्या पेट्रोल-डिझेलचे दर कधी कमी होतील याकडे सर्वसमान्यांचे लक्ष आहे. मात्र हे दर कमी होण्याची शक्यता माळवली आहे कारण सोईसुविधांसाठी दरवाढ होतच राहणार असल्याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिले आहे. वाढत्या इंधन दरवाढीबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होईल आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, दिलासा तर नाहीच पण पेट्रोल दरवाढीबाबत मोठा झटका बसला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. याउलट पेट्रोलियम उत्पादनातून मिळणाऱया कराचा वापर महामार्ग आणि एम्ससारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रुग्णालयांच्या निर्मितीसाठी करण्यात येतो, अशी माहिती केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर रविशंकर प्रसाद यांना पत्रकारांनी इंधन दरवाढीबाबत प्रश्‍न विचारला. यावेळी त्यांनी पेट्रोल आणि डीझेलच्या किमती कमी होणार नसल्याचे संकेत दिले आहेत.
दरम्यान, गेल्या 11 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचेच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. पण पेट्रोल आणि डिझेलचे दर जीएसटीच्या कक्षेत यावेत यासाठी आम्ही तयार आहोत. त्यासाठी जीएसटी काऊन्सिलमध्ये एकमत होणे गरजेचे असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. पेट्रोल डिझेलचे दर जीएसटीच्या कक्षेत आणल्यास महसूलामध्ये नुकसान होईल मात्र पेट्रोल डिझेलचे दर कमी होतील असेही मुख्यमंत्री म्हणाले. 


...तर भाजपला फटका ; दानवेंचा घरचा आहेर
पेट्रोल दरवाढ त्वरित नियंत्रणात न आल्यास याचे विपरित परिणाम भाजपला भोगावे लागतील अशी कबुली खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष, खासदार रावसाहेब दानवेंनी दिली. देशात सलग अकराव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली आहे. राज्यात पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोल 86 रूपये तर डिझेलचे दर 74 रूपयांच्या वर गेलेले आहेत. यामुळे सर्वसामान्य जनतेचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे.