Breaking News

वादग्रस्त ‘स्टेरलाईट’ प्रकल्पाला अखेर टाळे प्रदूषण मंडळाची कारवाइ

चेन्नई - तमिळनाडू प्रदूषण नियंत्रक मंडळाने तुथूकडी येथील विवादित ’स्टेरलाईट’ प्रकल्प बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच प्रकल्पाचा वीजपुरवठा गुरूवारी सकाळपासून बंद करण्यात आला आहे. स्टेरलाईट प्रकल्पाविरोधातील आंदोलनावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 12 जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

तुथूकडी येथील प्रकल्पाची प्रदूषण मंडळाच्या अधिकार्‍यांनी 18 आणि 19 मे रोजी पाहणी केली. त्यावेळी मंडळाच्या अधिकार्‍यांनी केलेल्या पाहणीदरम्यान नियम डावलून उत्पादन सुरू असल्याचे दिसून आले. डीएमके नेते स्टॅलिन यांनी आंदोलनातील जखमींची रूग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यानंतर तमिळनाडू सचिवालयाच्या बाहेर निदर्शने केली. यावेळी डीएमकेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी स्टॅलिन यांच्यासह आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. हिंसक आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी तुथूकडी येथील इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. परिस्थितीवर नियंत्रण रहावे तसेच अफवा पसरू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकार्‍यांनी दिली.