Breaking News

बनावट ओळखपत्रे जप्त, राजराजेश्‍वरी मतदारसंघातील निवडणूक स्थगित

बंगळुरू : कर्नाटकमधील राजराजेश्‍वरी नगर विधानसभा क्षेत्रातील एका फ्लॅटमध्ये बनावट मतदार ओळखपत्र सापडल्याने निवडणूक आयोगाकडून या मतदारसंघातील मतदानाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. राजराजेश्‍वरी नगर मतदारसंघातील जागेवार आता 28 मे रोजी मतदान तर 31 मे रोजी मतमोजणी होणार आहे. 8 मे रोजी आर. आर. नगर मतदारसंघातील एका फ्लॅटमध्ये जवळपास 10,000 बनावट मतदार ओळखपत्रे सापडली होती. दरम्यान, हा प्रकार गंभीर असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले होते. मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत, निवडणूक आयुक्त सुनील अरोडा आणि अशोक लवासा यांनी यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिलेत. राजराजेश्‍वरी नगर मतदारसंघात मतदारांना पैसे, महागडया वस्तू आणि अन्य वस्तूंचे वाटप करण्यात आल्याची तक्रार मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार अधिकाऱयांनी मतदारांना प्रलोभन देणाऱयांची मोठया प्रमाणात धरपकड करण्यासही सुरूवात केली आहे. यातील दोन घटना गंभीर असल्याचे सांगत निवडणूक आयोगाने या जागेवरील मतदानाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. 6 मे रोजी एका ट्रकमधून मोठया प्रमाणात सामान जप्त करण्यात आले. या सामानाची किंमत जवळपास 95 लाख रूपये असल्याची माहिती समोर आली आहे. तर याच विधानसभा क्षेत्राच्या जलहल्ली परिसरात छापेमारीदरम्यान एका फ्लॅटमध्ये बोगस मतदार ओळखपत्रे आढळून आली.