Breaking News

अत्यल्प दराने कांदा विकण्यापेक्षा साठवणूकीसाठी शेतकर्‍यांची लगबग

कांद्याचे वाढलेले उत्पादन व कमी झालेले भाव यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. कवडीमोल भावाने कांदा विकण्यापेक्षा भविष्यात अधिक भाव मिळेल या अपेक्षेने कांद्याची साठवण करण्यासाठी शेतकर्‍यांची लगबग सध्या सुरू आहे.

कर्जत तालुक्यातील आंबिजळगाव व परिसरातील गावे कांद्याचे आगार म्हणून ओळखले जातात आंबिजळगांव, आळसुंदे, खातगांव, शेगुड, माळंगी, लोणी मसदपुर, चिलवडी, चापडगांव, कोरेगाव, बेनवडी, थेरवडी राशीन व मिरजगाव या गावात प्रामुख्याने कांद्याचे मोठ्या प्रमाणावर पिक घेतले जाते. यावर्षी कर्जत तालुक्यातील अनेक गावात 5 हजार हेक्टर क्षेत्रावर कांद्याची विक्रमी लागवड झाली आहे. सध्या कांदा काढणीचे काम जोरात सुरू आहे. यामुळे मजुरांची टंचाई मोठ्या प्रमाणावर जानवत आहे. यावेळी कर्जत तालुक्यातील कांद्याच्या पिकाला अपेक्षेपेक्षा अधिक उत्पादन मिळाले आहे. मात्र सध्या बाजारात कांद्याला कमी दर आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बाजारभावाची हीच अवस्था आहे. सध्या व्यापारी शेतकर्‍यांकडून 5 ते 7 रुपयांपर्यंत कांदा खरेदी करत आहेत. मात्र या दराने कांदे विकण्यास शेतकरी तयार नाहीत. लागवड, खुरपणी, औषधे फवारणी मजुरांवर होणारा खर्च व शेतकर्‍यांची मेहनत हे सर्व मिळून उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मोठे कष्ट व खर्च करून काढलेले पिक कवडीमोल भावाने विक्री करण्यापेक्षा त्याची साठवण करण्यासाठी सध्या शेतकर्‍यांची लगबग सुरू आहे. कर्जत तालुक्यातील विविध गावात कृषी विभागाने एक हजारपेक्षा जास्त कांदा चाळी शेतकर्‍यांना दिल्या आहेत. मात्र या कांदा चाळी कधीच ओव्हर फ्लो झाल्या आहेत. यामुळे सध्या जुन्या प्रकारच्या वखारी करून त्यामध्ये कांदा साठवला जात आहे. गेल्या वर्षी कर्जत तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला होता. तसेच 55 गावात राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजनेतुन कामे केली आहेत. यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. शिवाय 1547 शेततळी भरली आहेत. यामुळे पाणी वाढले आहे म्हणून शेतकर्‍यांनी कांद्यांची लागवड केली. यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादन निघाले यामुळे सध्या शेतात कांदाच कांदा पहावयास मिळतो आहे. पावसाळा तोंडावर आला आहे. यामुळे कांदा भिजणार नाही ना याची दक्षता शेतकरी घेत आहेत. भविष्यात भाव मिळेल या अपेक्षेने हा खटाटोप सुरू आहे. नाफेडने कर्जत तालुक्यात खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी शेतकरी वर्ग करत आहे.