Breaking News

प्रधानमंत्री आवास योजनेला जागा मिळेना : कोते घरकुलासाठी १ हजार ४०० फॉर्म जमा


शिर्डी / प्रतिनिधी  - प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ‘सर्वांसाठी घरे’ या योजनेसाठी शिर्डी नगरपंचायतीच्यावतीने सुरु केलेल्या स्वतंत्र विभागातून आतापर्यंत १ हजार ४०० फॉर्म लोकांनी घेतले आहेत. त्या अंतर्गत योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता लोकांनी फॉर्म शिर्डी नगरपंचायतीकडे जमा केले आहेत. दरम्यान, शासन यासाठी जवळपास अडीच लाख रुपयांची आर्थिक मदत ही सबसीडीच्या माध्यमातून उपलब्ध करून

देणार आहे. परंतु शिर्डी सारख्या ठिकाणी या योजनेसाठी जागेचीच मोठी अडचण आहे. त्यामुळे जागा उपलब्ध होणार कधी आणि या गरिबांना घरकुल मिळणार कधी, असा सवाल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव निलेश कोते यांनी उपस्थित केला आहे. 

ते म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वांना घर देण्याचा प्रयत्न गरिबांच्या जीवनात आनंद निर्माण करून देणारा आहे, याबद्दल दुमत नाही. सरकार सत्तेवर येऊन जवळपास ४ वर्षे होत आली आहेत. परंतु लोकप्रिय घोषणा केल्या जातात. मात्र त्या पूर्ण करण्यासाठी त्यातील अडचणी दूर करण्यासाठीसुद्धा शासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. शिर्डी पंचायतीने १ हजार ४०० लोकांचे फॉर्म भरून घेतले. लोकांनीही ते सर्व नियमांची पूर्तता करून भरून दिले. आता या लोकांना घर मिळण्याची प्रतीक्षा आहे. नगरपंचायतीने ही सर्वे नं. ५४ व ५५ मधील जागेची मागणी साईबाबा संस्थानकडे केलेली आहे. आता संस्थान निर्णय कधी घेणार, लहान मोठे अनेक प्रश्न संस्थान सोडायला तयार नाही. शताब्दी वर्ष अर्धे संपून गेले. ठोस असे काम दिसायला तयार नाही. अशा वेळी या १ हजार ४०० लोकांच्या जिव्हाळ्याचा घराचा प्रश्न सोडविण्यासाठी नगरपंचायतीला साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम व सर्व विश्वस्तांनी एकमताने जी मागणी आहे, त्यावर ठोस निर्णय घेण्याची गरज आहे.